नवी नजर आणि स्वर्गाचा रंग !!!
मराठी किंवा हिंदी भाषेव्यतिरिक्त इतर भाषांचे चित्रपट मी पहावे असे काही ठरवून झाले नाही, माझा सगळा कारभार ’सहजच’ या सदरात मोडणारा
. त्यात या दोन भाषांव्यतिरिक्त इंग्लिश सिनीमे पहाणे म्हणजे ते हिंदीत डब झालेले किंवा सबटायटल्स असलेले असेच आत्ता पर्यंत जणू ठरलेले होते. उगाच कान ताणताणून संवाद ऐकायचे कशाला, हा मुळचा आळशी स्वभावाला धरून असणारा प्रश्न पडायचा आणि मी इतर भाषिक चित्रपटांच्या वाटेला जायचे नाही.त्यामूळे पाहिलेल्या इंग्लिश चित्रपटांची यादी तशी लहानशीच होती / आहे !!
गेल्या सुट्टीत भारतातून येताना विश्वास पाटलांचं ’नॉट गॉन विद द विंड ’ पुस्तक सोबत आणलं…. इतकं अभ्यासपुर्ण नजरेने चित्रपटांकडे पहाता येतं हे नव्याने समजलं !! गणेश मतकरींचा ’आपला सिनेमास्कोप ’ हा ब्लॉगही असाच सिनेमा कसा पहावा हे शिकवणारा. आमचा आनंद पत्रेही त्याच्या सिनेमा कॅन्वासवर अधून मधून रंग भरत असतो
… कोणे एके काळी हेरंब आणि विद्याधरही लिहीत असत, असे वाक्य इथे टाकण्याचा मोह आवरता घेतेय (वाक्य टाकून झाल्यावर
) !!!
थोडक्यात काय आजकाल मी साहेबाच्या चित्रपटांपासून फारकत घेतल्यासारखी वागत नाही. अधेमधे एखादा चित्रपट पाहून टाकते
तर याच नव्या दालनात एक लोभस दालन अचानक उघडलं माझ्यासाठी…. ’माजिद माजिदी’ नावाचं !!! एखाद्या प्रवासाला निघावं, वाट ठरलेली नसावी पण नेमक्या स्थळी जाऊन पोहोचावं असं काहिसं झालं या ठिकाणी !! माजिदीचा ’बरान’ पाहिला आणि लक्षात आलं हे वेगळं रसायन आहे…. हे झेपेल, आवडेल आपल्याला !!!
मी माजिदीबद्दल लिहावं किंवा एकूणात एखाद्या चित्रपटाबद्दल लिहावं असा काही माझा अभ्यास नाही हे माझं मत होतं, अजूनही आहे तरिही आज एक नोंद करावी वाटली म्हणून ही पोस्ट!!!
” The Color of Paradise “ …. Rang -e- Khoda … नावाचा सिनेमा पाहिला आणि पोस्ट लिहायला घेतली … हे परिक्षण नाही हे आधि नमूद करायला हवे …. हे आहे एक भारावलेपण !!
मोहम्मद हा आठ वर्षाचा मुलगा… जो पाहू शकत नाही !! तो तेहेरानच्या एका शाळेत शिकतोय . ब्रेल लिपीत भराभर लिहू वाचू शकणारा मोहम्मद हा चुणचूणीत मुलगा आहे. शहर आणि त्या अनूषंगाने येणारे टेपरेकॉर्डर, मोबाईल फोन हे बारकावे लहानश्या प्रसंगातून सामोरे येतात. शाळेला सुट्टी लागलीये, सगळ्या मुलांचे पालक येऊन मुलांना घेऊन गेलेत…. मोहम्मद एकटा आपल्या वडिलांची वाट पहातोय ….. तितक्यात बाजूच्या झाडांमधे पक्ष्याचं एक पिल्लू घरट्यातून खाली पडलय…. त्या पिल्लाला लहानसा मोहम्मद ज्या आत्मियतेने घरट्यात परत ठेवतो ते फक्त पहात रहावे. गंमत म्हणजे डोळ्यांनी सिनेमा पहाताना आपली नजर मोहम्मदच्या त्या पक्ष्यावर अलवार फिरणाऱ्या बोटांबरोबर फिरते. घरटं मोडू नये म्हणून अलगद्पणे घरट्याला तो चाचपडत शोधतो तेव्हा त्याची धडपड मनात उतरते.
मोहम्मदचे वडील (हाशेम ) येतात , ते मात्र त्याला परत नेण्यास उत्सूक नाहीत …. शाळा मोहम्मदला ठेवून घ्यायला तयार नाही… तिथे सुरू होतो मोहम्मदचा घरचा प्रवास. वाटेत बसने, घोड्याने होणारा प्रवास अखेर एका निसर्गरम्य प्रदेशात येतो…. बसमधल्या खिडकीतून मुठीत हवा पकडू पहाणारा मोहम्मद अत्यंत निरागस दिसतो. या प्रवासात जाणवते मोहम्मदचे निसर्गाशी असलेले नाते…. पाण्याच्या प्रवाहातल्या गोट्यांमधे त्याला अक्षरं सापडतात. पक्षी त्याला साद घालतात… डोळ्यांनी पाहू न शकणारा मोहम्मद निसर्गाशी मनमूराद संवाद साधतो.
मोहम्मदचं गाव, घर , त्याच्या विलक्षण सुंदर दिसणाऱ्या लहानश्या बहिणी (हानये आणि बहारें ) , त्याची कष्टाळू आजी सगळच अतिशय मोहक आहे. गावातल्या शाळेत डोळस मुलगा चुका करत वाचतोय एक धडा, आणि मोहम्मदने मात्र ब्रेललिपीत तोच धडा न चुकता खणखणीत वाचलाय…. त्यावेळेस शिक्षकाच्या चेहेऱ्यावरचे झरझर बदलणारे भाव पहाण्याजोगे. शिक्षकाबरोबरच आपण आधिच मोहम्मदच्या हुशारीच्या, जिवंतपणाच्या प्रेमात पडलेलो असतो. त्याच्या नजरेने जग पहायला लागलेलो असतो.
मोहम्मदच्या आजीची त्याच्यावर असलेली माया ठायीठायी दिसते…. तिचे सुरकुतलेले हात मोहम्मदला जगातले सगळ्यात सुंदर हात वाटतात. नातवासाठी राबणारे ते हात खरोखरीच खूप सुंदर आहेत. पुढे ही आजी जेव्हा घरातून निघून जाते तेव्हा रस्त्यात पाण्याबाहेर पडलेल्या तडफडणाऱ्या मासोळीला उचलून पुन्हा पाण्यात टाकते. हा प्रसंग चटकन विसरला जाणारा नाही…. सुरूवातीच्या एका प्रसंगात मोहम्मद चिमणीच्या पिल्लाचे प्राण वाचवतो आणि त्याची प्राणप्रिय आजी इथे तसाच एक जीव वाचवते…. त्या दोघांचं ते घट्ट नातं पहाताना paradise या शब्दाची महती समजते.
चित्रपटात एक महत्त्वाची किनार अजून आहे….
मोहम्मदच्या वडिलांना , हाशेमला दुसरं लग्न करायचं आहे …. त्यांना मात्र हा मुलगा ही या लग्नातली अडचण वाटतेय. एका साध्या कामगाराची ’मुलगा ’ आणि ’वैयक्तिक स्वार्थ ’ यातली घुसमट साध्या साध्या प्रसंगातून आणि वाक्यातून पुरेपुर उतरलीये. लग्नाची वेळ जवळ येते म्हणून मोहम्मदला दुसऱ्या गावातल्या एका सुताराकडे त्याचे वडिल सुतारकाम शिकायला पाठवतात. हा सुतार स्वत:ही अंध आहे. या सुताराला मोहम्मद सांगतो , “देवाचं माझ्यावर प्रेम नाही नाहितर त्याने मला डोळे दिले नसते का ?? ” एका लहानश्या मुलाचे ते प्रश्न, समज अस्वस्थ करून टाकतात. हाशेमच्या नजरेत वारंवार दिसणारी स्वत:बद्दलची ’दया’ आणि मोहम्मदचा राग करण्याबद्दल स्वत:ची वाटणारी लाज आणि चिड जाणवतात अगदी!!
मोहम्मदची आजी जग सोडून जाते तेव्हा तिच्यासमोर क्षणभर एक दिव्य प्रकाश चमकतो…. आईच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत मोहम्मदचे वडिल त्याला परत आणायला पोहोचतात. येताना एका प्रचंड वेगाने वहाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाजवळ ते येतात. प्रवाहावरचा लाकडी पुल ओलांडताना अचानक तो पुल खचतो आणि मोहम्मद त्या पाण्यात पडतो. त्यानंतरचे त्याच्या वडलांच्या चेहेऱ्यावरचे भाव अतिशय सुंदर उमटले आहेत. एका क्षणासाठी थबकलेले , ही आपली मोहम्मदपासून सुटका आहे का अश्या विचारात पडलेले वडिल पुढच्या क्षणी प्रवाहात वेगाने वहाणाऱ्या मोहम्मदच्या मदतीला धावतात. चेहेऱ्यावरची ती अगतिकता स्पष्टच सांगते वडलांच्या मनातलं मोहम्मदबद्दलचं प्रेम…. अक्षरश: खिळवणारा क्षण …..
प्रवाहाच्या प्रचंड वेगापुढे हाशेम आणि मोहम्मद हारतात ….. बऱ्याच वेळाने हाशेम शुद्धीत येतो , समुद्रकिनारी काही अंतरावर त्याला मोहम्मद निश्चल पडलेला दिसतो….. त्याची हालचाल बंद आहे आणि तितक्यात पक्ष्यांचे आवाज येताहेत… आपल्याकडे, कॅमेऱ्याकडे हाशेमची पाठ आहे , त्याच्या कुशीत मोहम्मद विसावलाय…. मोहम्मदचा हात, त्याची बोटं आपल्या दिशेला आहेत…. पक्ष्यांच्या त्या आवाजाला मोहम्मद पहातोय , त्याची बोटं हलताहेत…. एक सुरेख सोनेरी प्रकाश त्याच्या हातावर चमकतोय ….. The Color of Paradise , निसर्गाच्या इतका जवळ असणारा मोहम्मद आता नंदनवनातल्या पक्ष्यांशी बोलतोय!!!
.
.
आपण स्तब्ध… शांत !!!
का आवडला हा सिनेमा इतका की पोस्ट लिहावी वाटली ???
मला वाटतं माजिदीचं अत्यंत साधेपणाने कथा सांगणं हे महत्त्वाचं कारण आहे !! आपली आजी लहानपणी परिची कथा सांगते नं, खूप आवाज नसतो त्यात…. आजीच्या उबेत विसावलेले आपण आणि हळूवार कानावर येणारा तिचा आवाज ….. त्या आवाजाची आठवण माजिदी करून देतो आपल्याला आणि जिंकतो !!! उगाच मोठमोठे संवाद नाहीत, रडारडी नाही… हाणामारी तर नाहीच नाही….. मोहम्मद नकोसा वाटण्याचा , आणि त्याचबरोबर या नकोश्या वाटण्याबद्दल अपराधीपणाने मन पोखरलं जाण्याचा त्याच्या वडलांचा संयत अभिनय असो की मोहम्मदला दुर नेलं तेव्हा मला त्याची नाही पण तुझी काळजी वाटतेय हे त्राग्याने स्वत:च्या मुलाला सांगणारी त्याची आजी असो , अभिनय जेव्हा अभिनय वाटत नाही तिथे आपण गुंतत जातो. लहानश्या प्रसंगातून मोठी कथा सांगण्याची या दिग्दर्शकाची हातोटी खरच वाखाणण्याजोगी आहे.
मोहम्मदला दिसत नाहीये तरिही तो खूप काही पहातो त्याच्या हाताने, कानांनी !!! आपण ते सगळं अनूभवू शकतो अगदी त्याच्याबरोबर… परंतू त्याचवेळेस सभोवतालचा हिरवागार सुरेख परिसर, फुलांचे, झाडांचे, पानांचे , पक्ष्यांचे , आकाशाचे अप्रतिम रंग पडदा व्यापून मनात उतरतात. Paradise ’नंदनवन ’ हा शब्द लागू पडतो इथे. फुलांपासून बनवलेल्या रंगाचे धागे , अनेकरंगी गालिच्यांची आठवण करून देतात. इराणचे गालिचे इतके सुरेख का असतात हे पटतं !!
हा संपुर्ण चित्रपटच एखाद्या कुशल हाताने विणलेल्या रंगीबेरंगी गालिच्यासारखा आहे…. मोहम्मदच्या नजरेने म्हणजे त्याच्या हाताने पाहिल्यासारखा तो आपल्याला तितकाच तरल , हळूवार जाणवतो …. “दिसतो ” !!! भावभावनांचा गालिचा !!! ही नजर नक्कीच मिळवण्याजोगी….. त्याने स्वर्गाचे, नंदनवनाचे रंग पहायला हरकत नाही!!
माजिद माजिदीच्या चित्रपटांच्या, दिग्दर्शनाच्या प्रेमात पडलेय मी सध्या …. एक नवी नजर मिळतेय, एका जुन्या ओळखीच्या माध्यमाची एक नवी ओळख होतेय …. तसेही कोणाला नकोय सांगा बरं वाऱ्याची अलगद, मंद झुळूक , पकडता न येणारी तरी जाणवणारी आणि मोहात पाडणारी … !!!
(फोटो जालावरून साभार !! )
जगातल्या सगळ्यात उंच इमारतीच्या १२४व्या मजल्यावरून…..
गेल्या पोस्टमधे म्हटलं होतं की नव्या वर्षाची सुरूवात बुर्ज खलिफाच्या १२४व्या मजल्यावरून करायचा बेत आम्हाला बुकिंग न मिळाल्यामूळे पुढे ढकलावा लागला होता, तो अखेर ६ तारखेला पुर्ण केला आम्ही !!!
बु्र्ज खलिफाच्या नावासोबत दिलेल्या विकीमातेच्या लिंकवर त्याबद्दल बरीचशी माहिती आहेच. तशीच माहिती मागे देवेंद्रने त्याच्या ब्लॉगवर इथे लिहीली होती.
दुबईत गेल्यानंतर दुरवरून दिसणाऱ्या या इमारतीबाबत कायम कुतूहल वाटत होते. त्यात तिचे आधिचे ’बुर्ज दुबई’ हे नाव बदलून ’बुर्ज खलिफा’ होण्यामागे, अबूधाबीच्या खलिफाने ( राज्यकर्त्याने )या इमारतीसाठीचे कर्ज फेडण्यासाठी दुबईला केलेली आर्थिक मदत हे कारण आहे समजल्यावर तर आता ही इमारत दुबईत असली तर अबूधाबीचा मात्र तिच्याशी संबंध आहे असे वाटले
अबूधाबीतून सकाळी निघाल्यावर तासाभरात दुबई मॉलमधे पोहचता येतं. तिथलं aquarium आणि Under water zoo पाहिल्यावर , दुबई मॉलच्याच दुसऱ्या बाजूला असणाऱ्या बुर्ज खलिफाच्या प्रवेशद्वाराशी आम्ही पोहोचलो.
बुर्ज खलिफाची दिशा दाखवणारा बोर्ड
At the Top या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जिथे तिथे बुर्ज खलिफाच्या प्रतिकृती आहेत. मला खरच उत्सूकता होती ती एका मिनिटात १२४ मजले चढून जाणाऱ्या जगातल्या सगळ्यात वेगवान लिफ्टमधे चढण्याची. तिथपर्यंत पोहोचताना UAE बद्दल माहिती देणारे स्लाईड्स ही एक सुरेख सोबत होती !!!
आम्ही लिफ्टसाठी थांबलेलो असताना एकीकडे बुर्ज खलिफाची संपुर्ण माहिती दाखवली जात होती. त्यात काढलेले काही फोटो….
हे काही सगळे फोटो नाहियेत अर्थात कारण माझे फोटो काढून होइपर्यंत लिफ्ट आली.
जगातली सगळ्यात वेगवान लिफ्ट समोर आहे
लिफ्टमधल्या एका मिनिटात सगळ्यांच्या कानाचे दडे (ज्याला चिरंजीवांनी कानाचे धडे असे नामकरण केले
) बसले वगैरे चर्चा सुरू होती… माझ्याबाबत असे काही झाले नाही चक्क…. आपण अखंड बोलत असलो तर कानाचे दडे बसत नसावे असा (जावई)शोध मला लागला त्यादिवशी … आणि तासनतास न थांबता बोलू शकणाऱ्या व्यक्तीला एक मिनीट सलग बोलणं काय कठीण यावर घरच्यांच एकमत झालं
आता मात्र मी काही बोलणार नाहीये…. फकस्त फोटो…. खरं सांगते उंचीला घाबरणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला असं १२४ व्या मजल्यावरून खाली वाकायला लावणं सोप्प नाहीये… पण तिथे असणं हा एकूण प्रचंड अविस्मरणीय अनूभव होता…. प्रचंड शांतता, आणि दुरवर दिसणारं दुबई शहर….. नजर पार क्षितीजावर न्या, कोणतीही इमारत , अडथळा थांबवणार नाही तूम्हाला….निसर्गाने उधळलेले असिमीत रंग आणि त्यात एरवी उंच वाटणाऱ्या मानवनिर्मीत इमारतींची रांग…. रस्ते, त्यावर असलेले अजून रस्ते, आणि लहानश्या दिसणाऱ्या गाड्या … मजा आली सगळं पहाताना !!!
’विमानात बसलेल्या माणसाला वर आकाशातून खाली पहाण्यात काय नाविन्य ’ असं माझ्या शेजारी उभं राहून बोलणाऱ्या पंजाबी बाईला ढकलून द्यावं वाटलं होतं मला क्षणभर… तिला समजावून सांगावं की अगं बये विमान आकाशात थांबत का तूला एखादी गोष्ट पुन्हा पहावी वाटली तर, अनेक मुद्दे मांडावे वाटले पण समोर दिसणारं मानवाने उभारलेलं आकाशाला गवसणी घालणारं आश्चर्य बाकि काही सुचू देत नव्हतं !!!
रस्ते पे रस्ता, रस्ते पे गाडी …
मधे खाली वर गिरक्या घेणारा मेट्रोचा ट्रॅक ..
वर उरलेले ७६ मजले…. यात म्हणे शाहरूख खान आणि अमिताभ बच्चनचे फ्लॅट्स आहेत !!
सोन्याच्या नाण्यावर बुर्ज खलिफाचे चित्र मिळण्याचे ATM
डोळ्याचं पारणं फिटेपर्यंत क्षितीज न्याह्याळल्यानंतर , दुर दिसणाऱ्या अरबी समुद्राला मनसोक्त पाहिल्यानंतर ….. इच्छा असेल तर गगनभरारीच नव्हे तर आकाशाला गवसणी घालणं शक्य आहे हे भान मनात आल्यानंतर….. दिव्य असा एक , किंवा शब्दात बांधणं शक्य नाही असा अनूभव घेतल्यानंतर सुरू झाला परतीचा प्रवास ……
14 :04 ला १२४ व्या मजल्यावर असणारी लिफ्ट…
14 :05 ला Ground Floor ला पोहोचलेली होती
परत येताना जागोजागी बुर्ज खलिफाबद्दल माहिती देणारे बोर्ड आणि प्रतिकृती होत्या. सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे या बांधकामात असणाऱ्या अगदी मजूर, कामगारांपासून ते ईंजिनीयर पर्यंत सगळ्यांचे जागोजागी नावासह लावलेले फोटो !!
अनेक बाबींमधे जगात ’सगळ्यात पहिल्यांदा ’ आणि ’सगळ्यात उंच ’ असे बिरूद मिळवणाऱ्या या इमारतीतला सुंदर अनूभव देखील मनात आठवणींच्या राज्यात वरचं स्थान पटकावणार हे नक्कीये.
बुर्ज खलिफाचं रात्रीचं मोहक रूप ….
आमच्या देवेंद्रने दवबिंदू या त्याच्या ब्लॉगवर २०१० मधे बुर्ज खलिफाबद्दल ’सहजच’ वर पोस्ट येइल असं भाकित केलं होतं…. ते खरं करताना मात्र २०१२ उजाडावं लागलं
पोस्ट लिहावी असा मोह झाला होता एकदा, त्यात माहिती वगैरे टाकावी…. पण अशी अप्रतिम उंची गाठणं हे सामर्थ्य माझ्या शब्दात नाहीये… तेव्हा तुर्तास फोटोच… और कुछ नही !!! बाकि लिंका दिलेल्या आहेतच…. उधर मिलेंगी बरीच माहिती !!! माझं म्हणणं एकच, जिथून एकाच वेळी मानवनिर्मीत आश्चर्य खुजे वाटावेत आणि त्याचक्षणी मानवाच्या ताकदीला सलाम करावासा वाटावा अश्या ठिकाणी मी तास दिड तास होते
तळटिपा :
गेल्या एक दोन पोस्ट जरी मी प्रवासवर्णनं लिहीत असले तरी आम्ही भारताबाहेर रहाणारे कसे ग्रेट वगैरे काहिही किंतू माझ्या मनात नाही बरं !! हे उगाच शहाणे करावे सकल जना , आणि जे मला भावले ते पोहोचवण्याचा मार्ग आहे म्हणून इथे येतेय !! (हे झाले नव्याने ब्लॉग्स वाचणाऱ्यांसाठी )
घाबरू नका, वाळवंटातले आश्चर्य यावर आश्चर्य आणि वैताग वाटावा इतपत मी पिडणार नाहीये बरं
( हे जुन्या जाणत्यांसाठी )
Al – Ain zoo आणि नव्या वर्षाची सुरूवात!!
नव्या वर्षाची सुरूवात, आई-बाबा इथे अबूधाबीत आलेले ….. मग ठरवलं काहितरी वेगळं करायचं . बुर्ज खलिफाच्या १२४ व्या मजल्यावरून दुबई शहराचं दर्शन करावं असं ठरवलं पण तोच विचार माझ्याआधि अनेकांनी केलेला असावा बहूधा
. मला काही ते बुकिंग मिळालं नाही. मग राहिलं ते अगदी जवळच्या अल -ऐन (Al Ain) या एमिरातीतलं Zoo . मुळात वाळवंटात असे अनेक प्राणी कसे ठेवतात याचे कुतूहल होतेच. मग सर्वानूमते , म्हणजे घरात खरच लहान असलेले बालक आणि माझ्यासारखे वय वाढूनही स्वत:तलं लहान मुल जिवंत ठेवलेल्या मोठ्यांच्या मते प्राणीसंग्रहालय फायनल झाले!!!
जबेल हाफीत (Jabel Hafeet ) पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले ९८८ एकर जमिनीतले हे प्राणीसंग्रहालय पहायला जाताना मला मुलांइतकाच उत्साह वाटत असताना एक जाणवलं की बाल्य आपल्याला सोडून कुठेही जात नाही, लहानपणी राणीच्या बागेत जाताना असेच काही भाव मनात ठेवून मी गेले असावे!!
नेहेमीप्रमाणे गाडीत आधि ’Petrol Full ’ केले गेले, म्हणजे रस्ता चुकला तरी घाबरायला होत नाही मला, आणि नवऱ्याला रस्ते चुकवायची आयती संधी मिळते
प्रवासाच्या पहिल्या पंधरा – वीस मिनिटात Camel Race Track असा बोर्ड दिसला आणि त्या पाठोपाठ शर्यतीसाठी तयारी करत असलेले उंट आणि अरब!!


गाडीचा हॉर्न वाजला की पळण्याचा वेग वाढवणारे उंट पहाणे हा सर्वस्वी नवा अनूभव होता.
तिथून जरा पुढे गेल्यावर आणि एक आश्चर्य आमची वाट पहात होते. आपल्याकडे शेळ्या- मेंढ्या जसे कुंपणात दिसतात तसे जागोजागी उंट दिसत होते. त्यात जवळपास काळा रंग असलेला एक उंट मात्र पहिल्यांदा पहायला मिळाला.
रस्ता एकीकडे वेगवेगळ्या थरात वाळू असलेला वाळवंटाचा आणि एकीकडे प्रचंड हिरवीगार वनराई राखून ’वाळवंट ’ या शब्दाला छेद देणारा….
अल- ऐन शहर कायम आठवेल ते तिथल्या हिरवळीने नटलेल्या सौंदर्यासाठी. मला माझे नासिक क्षणभर आठवून गेले
रस्त्यात आलेला एक राऊंड अबाऊट पाहून zoo आता जवळपास आहे याची खात्री पटली आणि नवऱ्याने चक्क रस्ता चुकवला नाही हे जाणवले
आणि मग समोर आले ते प्राणीसंग्रहालय
…. आता मात्र माझं लिखाणाची फारशी गरज भासणार नाही, कारण फोटोच पुरेसे बोलके आहेत, अर्थात अधून मधून बोलल्याशिवाय मला चैन पडायचे नाहीच हा भाग निराळा …..
Zoo Entrance
Chilean Flamingo
आता मात्र तो प्राणी दिसणार होता ज्याला पहाण्याची मला मोठी उत्सूकता होती!!

ह्या पठ्ठ्याने मात्र कोणाचीही दखल न घेता मस्त ताणून दिली होती….
प्राणीसंग्रहालयात पिंजऱ्यात बंद प्राण्यांना भेटायला ’मोकाट’ सुटलेला मनूष्य ’प्राणी’ येऊन गेल्याचा पुरावा झाडावर सापडला
बिबळ्या महाराजांना काही फोटो काढू द्यायची इच्छा नसावी, ते तरातरा फिरत होते
Jaguar !! आणि हो याला नसेल फोटो काढून घ्यायचा , मी हार मानतेय होय, सापडला किनई कॅमेऱ्यात
पुढे होते Bengal Tiger !!! यांनी काही कोणाला शेवटपर्यंत दर्शन दिले नाही.
कबूतरांचे घरटे बांधणे सुरू…..आम्हालापण Zoo मधे रहायचं पण आमचं आमचं घर बांधून
प्राणीसंग्रहालयात वेळोवेळी होणारा थंडगार पाण्याचा आल्हाददायक वर्षाव
Hedgehogs या निशाचर प्राण्याला मराठीत काय म्हणतात हे कोडं मी सोडवत असताना ’साळिंद्र’ हे उत्तर तात्काळ देऊन ’इथे टाळी घेतली ती नवऱ्याने’ असं म्हणण्यास मला भाग पाडलं
कोण म्हणतं वाळवंट रखरखीत असतं???
Mongoose
मला विलक्षण आवडलेला फोटो, अर्थात हा अजून स्पष्ट यायला हवा होता!!!
या zoo मधे प्राण्यांची घेतली जाणारी काळजी, प्राणीसंग्रहालयातलं प्रसन्न वातावरण निश्चित आवडणारं. एक संपुर्ण दिवस इथे सहज घालवला जाऊ शकतो…. बाजूलाच मुलांना खेळायला असलेली विस्तृत हिरवळ, आणि खेळण्यांची उपलब्धता पहाता वारंवार इथे यावेसे वाटले तर चूक नाही !!!!
Bird Show मधे falcon या UAE च्या राष्ट्रीय पक्ष्याबद्दल अधिक माहिती मिळते. हा शो पहाता आला नाही याची खंत अल ऐन सोडताना आम्हाला वाटत होती!!!
जवळपास पाच तासांची अथक भटकंती आणि अनेक वर्षानी पाहिलेले प्राणीसंग्रहालय….. घरून करून नेलेले पोळी भाजीचे साधेच जेवण पण सगळं कुटूंब एकत्र…. खूप खूप धमाल!!! एकूणात एक अविस्मरणीय सुरूवात एका ’नव्या वर्षाची’
मातीतून सोने उभे करणारे अरब, आणि सोन्याची माती करणारे आपण भारतीय ही अटळ तूलना नेहेमीप्रमाणे मनात येते तशी ती इथेही आलीच!!!
तर मंडळी….. आमची तर नव्या वर्षाची सुरूवात मस्त झालीये, तुम्हा सगळ्यांची झाली असेल अशी आशा आहे.
येणारे हे नवे वर्ष ब्लॉगच्या सगळ्या वाचकांसाठी आणि त्यांच्या कुटूंबियांसठी सुख , समृद्धी आणि समाधान घेऊन येवो अश्या मनापासून सदिच्छा !!!
मन थिर रहे नं….
अस्वस्थता येते…. येते म्हणजे ’येते आपली ’ …. बिनबुलाया मेहेमान आहे ती…. कारण न विचारता, न सांगता हजर होते…. ’घालवल्याशिवाय’ जात नाही सहसा!!! कोळ्याच्या जाळ्यासारखी आपल्याला वेढणारी ….. आपल्या आत असते न बाहेरही, काहीच रमवू शकत नाही मग!!! थकायला होतं…. घाबरायला होतं… अस्वस्थ होतं!!!
समोर कोणी विचारणारं , आपल्या अस्वस्थतेत अस्वस्थ होणारं माणूस काळजीने विचारतं , काय झालय??? … आपल्याचकडे नसणारी उत्तरं देता येत नसतात!!! कागदाची फिरकी असते नं, ती अशी उंचावरून खाली सोडली की गोलाकार भिरभिरत जमिनीवर येते , तसं हलकं होतं मन , त्याच्या फिरकीला भिरभिरायला भरभक्कम कारण लागत नाही !! आपल्या मनाची अशी बेछूट भिरभिरलेली फिरकी आपल्याला उचलून आणताना मात्र जड वाटते बरेचदा …. पेलेनासं होतं कधी कधी सारं!!! ’आधार’ हवा हवा वाटतो….
आपल्यात अनेक बाबतीत सुधारणेला वाव आहे , किती बडबड करतो आपण, नेमकं हवय काय आपल्याला…. ’ सुख बोचतं ’ अशा यादीत आपणही आहोत का ???
सपशेल हार मानायची वेळ …. आपलं ओझ कुणाच्या खांद्यावर द्यायची वेळ …..मनात काहीतरी उमटतं…
बूडत ही भव के सागर में,
बहियाँ पकरि समुझाए रे , फकिरवा!
आणि मग येते त्या फकिराची आठवण !!! समजते लगेच, आता हा उचलणार आपले ओझे…. जिगसॉ पझल चे विखुरलेले भाग हा रचणार आता सुबक!! शांत बसावे पुन्हा आपण , अनेकदा याच्या समोर बसून समाधि लावतो तसेच ….तो बोलू लागतो… त्याला काही सांगावं लागत नाही, ’काय कशी काय वाट चुकलीस ? ’ तो मुळीच विचारत नाही…. वाट सापडेनाशी झाल्याशिवाय मी येणार नाही तो जाणून आहे जसा!!!
पानी बिच मीन पियासी,
मोंही सुन सुन आवै हाँसी ;
घर में वस्तु नजर नहिं आवत ,
बन बन फिरत उदासी ;
आतमज्ञानविना जग झूठा ,
क्या मथूरा क्या कासी ?
आत्मज्ञान
… अरे बाबा ते मिळवता आले असते तर तुझं दार ठोठावलं असतं का रे ?? आणि हा पहा कसा म्हणतोय, ” मोंही सुन सुन आवै हाँसी ” !! कबिराला देता येतो हा अधिकार…. हस बाबा तू हवा तर माझ्यावर, पण तारून ने मला !!! तो मग एक एक शब्द हलका हलका उच्चारत आपल्याला थोपटतो…. एका दमात काही सांगायची त्याला घाई नाहीये, बरं तो सांगेलही त्याची आहे ती क्षमता… आपल्याला झेपायला हवं नं पण!!! एक दिशाही नकोय उपदेशाची… कबिरा तू सांगत रहा मी ऐकतेय…..
मला अनेक व्यथा नं ताप आहेत… खूप नाही पण काही मोजक्या , तुझ्याचकडे करता येतील अशा तक्रारीही आहेत….
मुसा खेवट नाव बिलइया,
मींडक सोवै साप पहरइया ;
सगळेच शब्द नाही कळत पण हे जे काय आहे ते उलटसुलट आहे…. झोपलेल्या बेड्काला साप राखतोय….विरोधाभास सारा!! हो अशाच अर्थाच्या तर असतात नं तक्रारी, सगळं तिरपांगडं असतं रे !! मार्ग दाखव रे….
बोलना का कहिये रे भाई,
बोलत बोलत तत्त नसाई ;
बोलत बोलत बढै बिकारा,
बिनबोल्या क्यूँ होइ बिचारा ?
संत मिले कछू कहिये कहिये ,
मिलै असंत मुष्टि करि रहिये ;
ग्यानी सूँ बोल्या हितकारी ,
मूरिख सूँ बोल्या झष मारी ;
कहै कबीर आधा घट डोलै ,
भरया होइ तो मूषा न बोलै!!
किती सहज आहे हे…. संतासमोर असाल तर बोला नक्की मात्र असंत असेल समोर तर उगी रहा!!! जमणार कितपत शंका आहे मात्र
.. जरा प्रयासाने जमवलं नं पण तर मनस्ताप संपलाच सारा!!!
कबीराच्या पुस्तकाची पानं उलगडत जायची आहेत… क्रम न ठरवता… इथे क्रम नसणं आणि तरीही आधाराची हमी वाटणं किती महत्त्वाचं आहे नं!!! कुठलंही पान उघडा , कबीर खंबीर उभा आहे समजावयाला…. आयूष्याच्या पुस्तकाची किती पान आपण उलटलीत यावर आपलं शहाणपण ठरतं नाही, गोंधळायला होतंच ….. हा मात्र ’ मस्तमौला ’ स्वत:च्याच धुंदीत गातोय…. एका अनाहत नादात स्वत:ही रमतोय आणि जगाला रमवतोय!!! ’बळ ’ मिळतं या सावलीत!!!
तू आहेस बाबा अमर … आमची तितकी कुवत नाही… मर्त्य असू दे आम्हाला!!!
हरि मरिहै तो हमहू मरिहैं
हरि न मरै , हम काहेकू मरिहैं ?
आहे किनई मुद्दा बिनतोड…. ही वल्ली बिनतोडच आहे…. ’अवाक’ होऊ दे मला… थक्क होऊ दे!! आजकाल खुपसे थक्क होणे होत नाही…. माझे ज्ञान वाढले भलतेच असे काहीही नाही तरीही पूर्वीसारखं हरखून जाणं फारसं जमत नाही!! ही हार की जीत कोणाला माहित रे!!! ’हार’ असावी कदाचित…. नवनवं काही मन शोधत असतं मात्र…. त्याला आवडतं चकित व्हायला!!!
तू बाळगतोस ते सामर्थ्य…. गेल्यावेळी वाचल्या होत्या की मी या ओळी… तरीही त्याच पुन्हा वाचताना ’बोध’ होतो !!!
दरियाव की लहर दरियाव है जी,
दरियाव और लहर में भिन्न कोयम ?
उठे तो नीर है, बैठे तो नीर है ,
कहो जो दुसरा किस तरह होयम ?
उसीका फेरके नाम लहर धरा,
लहर के कहे क्या नीर खोयम ?
जक्त ही फेर जब जक्त परब्रम्ह में,
ज्ञान कर देख कबीर गोयम .
नावं बदला, जागा बदला… तरिही एक आहे सारं!! असचं ’तादात्म्य ’ पावायला होतं कबीराशी…. ’तादात्म्य ’ कधी वापरेन हा शब्द वाटलंच नव्हतं!!! इथे तोच येतोय पण मनात….
किती वाचलं , किती समजलं , किती उमगलं
…. शंका येतच नाहीत मनात….. चुळबुळणा-या मनाला कान पकडून एका जागी निवांत बसवण्याइतपतं समर्थ आपण आहोत असं वाटतं!!! पुढचे निदान काही दिवस तरी बेटं सरळ चालेल असं वाटतय…. आणि कबीर कुठे जातोय मला सोडून… तो सखा आहेच सोबत!!!
मै कहता तू जागत रहियो , तू जाता है सोई रे ,
मै कहता निरमोही रहियो, तू जाता है मोहि रे !!
नाईलाज आहे रे कबीरा, ’मोह ’ कमी केले जाऊ शकतील पण निर्मोह व्हायचा नाही त्यामुळे तुला पुन्हा पुन्हा गाठावे लागते बघ!!!
सध्या तूला अलविदा म्हणते… पुन्हा भेटेनच… आणि काय लिहू, तू जाणतोच सारे!! पुन्हा डोळे मिटायला लागतील , तेव्हा ” जागत रहियो ” असं दटावून घ्यायला तुझ्याचकडे येणार मी!!!
मागे ’ विसाव्याच्या वळणावर ’ भेटला होतास… आज तुझ्याकडे वळून विसावलेय!!! हे असेच होत रहाणार , की हे व्हावे असे मलाही वाटते
… काहिही असो,
कहै कबीर ताको भय नाहीं , निर्भय पद परसावै!!! ![]()
आणि काय हवे!!!!!
थीम सॉंग….
माझ्या परिचयाचं गाणं… आधि बाबांचं लाडकं गाणं ही ओळख आणि पुढे जाऊन समजलं की बाबांच्या लाडक्या यादीमधली गाणी ही कुठल्यातरी चित्रपटात कोणितरी इतरांनी म्हटलेली असतात
मात्र अजूनही ती गाणी बरेचदा आठवतात ती बाबांच्या आवाजातलीच…. त्यांची गाणी म्हणजे मुख्यत्त्वाने मुकेश किंवा रफी!!! किशोर हा प्रत्येक तरूण मनाला कुठल्यातरी टप्प्यावर गाठतोच आणि मग हळूवार सोबत करतो हे बाबांना क्लियर होते वाटतं (पुछना पडेगा एक बार )!!
अर्थात त्यांच्या यादीत वर्ज्य कोणीच नव्हते , त्यांच्या गात्या गळ्याला अगदी आतिफ अस्लमही ’चालतो” … आमची पिढी, हल्लीची पिढी वगैरे गुंते न घालता चांगलं गाणं या टप्प्यावर ते असतात हे मला कोण आवडतं नेहेमी. नाही म्हणजे जनरेशन गॅप नामक भानगड उरत नाही त्यामूळे!! मात्र रफी न मुकेश हे यादीतले परमनंट बाकि सगळे कॉट्रॅक्ट बेसिसवाले…
….. तर वर दिलेलं गाणं हे माझ्या माहितीतलं, पाठ , आवडतं वगैरे जे काय ते हेच … रफीचं…
काही गाण्यातल्या काही ओळी मनाचा ठाव घेण्याआधि नं ’ऐकणाऱ्या तुझं वय किती रे ? ’ असा प्रश्न विचारत नाहीत…. त्या मुकाटपणे मनात त्यांची जागा मिळवून टाकतात. तशी या गाण्यातली ’मेहेफिल क्या तनहाई मे भी लगता है जी … तुमको चाह के ss’ या ओळीने माझ्या बऱ्यापैकी लहान वयात (जेव्हा तनहाई वगैरे समजत नव्हतं, अनूभव तर दुर) मनात टकटक केलेली होती. त्या दरम्यानच्या अश्या आणिक दस्तका म्हणजे ’ देखो मैने देखा है” या गाण्यातली लडाईची ओळ, ह्या गाण्याने एक काय भुरळ घातली होती देव जाणे पण अजूनही ते तितकच निरागस वाटतं
…. ’ये तो बोलो होगी कहाँ पे लडाई’ ला अमित कुमारने दिलेलं ’मैने वो जगह ही नही बनाई’ हे उत्तर ऐकताना जे वाटतं त्याला ’रोमॅंटिक’ म्हणतात हे अंमळ उशिरानेच कळलं
… ही एक स्वतंत्र मोठी यादी होइल अर्थात!!
तर….
काल झालं काय माझा नवरा गात होता ’तुम बिन जाऊँ कहा ’
….. (लग्नाला अकरा वर्ष झालीत, नवरा कशाला गातोय गाणी… ह्या या बाईच्याच थापा आहेत वगैरे वाटणाऱ्यांना प्रांजळ सुचना की तुम्हाला यात वेगळं काही वाटलं तर त्याचा अर्थ ’तुमचं आमचं सेम नसतं’ इतकाच घ्या…. नसता त्रागा नको
) … मुद्दा हा की नवरा गाणं तेच गात होता माझ्या ओळखीचं पण शब्द वेगळेच…. झाला नं घोळ, ज्या बायकोला खुश करायला गेला तो, तीच रागावली
… बरं कधी नाही ते नवराही ठाम त्याच्या मुद्द्यावर…. यूट्यूबाला शरण गेल्यावर समजलं ’प्यार का मौसम ’ नावाच्या चित्रपटाबद्दल आम्हा दोघांच्या अज्ञानामुळे आमच्या घरात हा वादळ का मौसम येऊ घातला होता.
एकच गाणं रफी आणि किशोरदा दोघांच्याही आवाजात आहे … एका कुटूंबाचं ते थीम सॉंग आहे…. मग मिलना बिछडना वगैरे नेहेमीचा मामला आहे हे सगळं समजलं मग!!!
आजवर ह्या असल्या थीम सॉंगच्या प्रकाराचं मला ’ह्या असं असतं का कधी… काहिही दाखवतात ’ इतकं स्पष्टीकरण पुरेसं वाटत असे…. म्हणजे ’यादों की बारात’ , ’मेरी जंग ’ किंवा ’वक्त’ वगैरे तमाम बिछ्डों की दास्तान हे माझ्यासाठी मात्र, कल्पनाविलास आहे नुसता , वेडं बनवायची कामं असं उत्तर होतं!!!
आज मात्र माझ्याकडच्या दोन पिढ्या एकच गाणं , भलेही वेगळ्या शब्दात का असेना पण गात होती माझ्या समोर!!!
…. जरा विचारात पाडलं मला ह्या प्रकाराने…
पोस्टचा मुद्दा अजूनही आलेला नाहीये नं…. की जे काय माझ्या मनात आत्ता डोकावतोय तो काही मुद्दाच नाहीये हे आपण नंतर ठरवूया तूर्तास!!
निव्वळ एक गाणं माझे बाबा आणि नवरा यांच लाडकं असतं तर हा विषय इथेच संपू शकला असता , परंतू हे एक गाणंच नाही तर माझ्या बाबांच्या आणि नवऱ्याच्या बऱ्याच सवयींमधे मला अनेकदा साधर्म्य सापडलय!!! एखाद्या प्रसंगात ते कसे वागतील हे अनेकदा मिळतंजूळतं असतं…. अगदी ’रास’देखील एक आहे दोघांची…..
मग हे असं आहे म्हणून का ’माझा नवरा’ हाच ’माझा नवरा’ आहे ????
समजतोय का मुद्दा ???? दोनदा नाही लिहीलेला एकच शब्द… दोनदा आहेच तो …. ’प्रेमात पडतो’ नं आपण म्हणजे नक्की काय होतं मग??? की आपण आधिपासूनच काही गुणांच्या प्रेमात असतो आणि ते सापडले एखाद्यात की आपल्याला ती व्यक्ती आवडते…. आहे नं गुंता…. नाही ही चर्चा चेहेरा पाहून प्रेमात पडणाऱ्यांसाठी नाहीचे, लेट मी क्लियर मायसेल्फ, खऱ्या प्रेमाबद्दल बोलतेय , विचारतेय मी!!!!
आपण समानधर्मी माणसं शोधत फिरतोच नं…. ’स्वभाव’ सारखे असणं की ’थीम ’ एक असणं ???
की खरच एक ’थीम’ असतंच आपलं आयूष्याकडे बघण्याचं….. आपलं आपलं एक गाणं, आपलेच शब्द आपलेच काव्य न आपली आपली एक स्वतंत्र चाल त्याला… त्याच्या तालासुरावर रमत आपण मार्गक्रमण करत असतो …… आपल्या कुटूंबाचं गाणं!!! काही मतं, अंदाज, ठोकताळे…. हसण्याची, रडण्याची एक सवय….. असतं की नाही, प्रत्येक कुटूंबाचं आणि त्या कुटूंबावर प्रेम करणाऱ्या कुटूंबातल्या प्रत्येक सदस्याचं , सगळ्यांच मिळून असतं एक ’थीम’ …. तशीच माणसं मग शोधली जातात,जोडली जातात, ती आवडतात, त्यांच्यात जीव रमतो…. त्यांच्या सहवासात जीव सुखावतो……
आमच्याकडे अमकी सिरियल पाहिली जाते, तमका पदार्थ या नाही त्या पद्धतीने होतो, गणपती इतक्या दिवसांचा असतो, तमका रंग चालत नाही, कुलाचार-प्रथा वगैरे बोलत नाही मी त्या रुढी नको पण सोप्पंस आयूष्य जगताना एक पद्धत आपोआप ठरतेच की आपली…. तेच की एक ’थीम’
अगदी फिल्मी नाही तरी या सामान्य कुटूंबाचं ’एक सुत्र’ असण्याच्या मुद्द्याने गंमत केली खरी मग…..
मग सिद्धता सिद्धच झाली की असे नाही आपण पटकन मैत्री करत कोणाशी… त्याला जबाबदार असते हे ’थीम’ …. एकतर ते आपल्याला आवडते तरी नाहितर नावडते तरी…. पण शोधाशोधीची दिशादर्शक तेच…..
कोण हवं कोण नको ठरवणारं ’थीम’ ….. असतं बरं का थीम सॉंग
बाकि राहू देत साध्य न सिद्धता वगैरे पण इथून पुढे मी थीम सॉंगवाले तमाम सिनीमे मात्र मन लावून पहाणार हे नक्की
आणि हो बाबा आणि माझे नवरोजी आज मी पण म्हणतेय ” तुम दोनों बिन जाऊ कहाँ!!! ”
दत्त- दत्त…. दैनिक कृषीवलने घेतलेली दखल!!
ब्लॉग सुरू आहे आपला म्हटल्यावर त्यावर नित्य नव्या पोस्ट्स येणार हे आलेच ओघाने . त्यात काही पोस्ट्स जमतात काही चुकतात. काहीबद्दल आपणच तटस्थ होतो. मात्र त्यातल्या काही (मोजक्या
) आपल्या स्वत:च्या आवडत्या असतात. म्हणजे पुन्हा वाचू गेलं तर आपलच लिहीलेलं आपल्याला निदान वाचावसं वाटतं त्या….
त्यातलीच एक हल्ली मला रूचलेली माझीच पोस्ट म्हणजे ’देऊळ … तू झोप मी जागा आहे!! ’
नेहेमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या रूपात एका आंतरराष्ट्रीय महोत्सवात देऊळ पहाण्याचा योग, दिलीप प्रभावळकरांची भेट आणि गिरीश कुलकर्णीशी फोनवर झालेले बोलणे असे अनेक कारणं देऊळ माझ्यासाठी अधिकाधिक स्पेशल बनवत होते. त्यात भर पडली ती माझ्या या पोस्टची ’ दैनिक कृषीवल ’ ने घेतलेल्या दखलीमूळे. कृषीवलच्या कलासक्त पुरवणीत ’देऊळ’ वरील माझं मत हे कव्हर स्टोरी म्हणून निवडले गेले. माझ्यासाठी हा एक सुखद आश्चर्याचा धक्का होता.
कलासक्त पुरवणीचे पहिले पान :
” देवळाशिवाय गाव ही कल्पना कोणाला सहन होणार नाही, इतकं महाराष्ट्रातलं भावजीवन देवळाभोवती गुंफलं गेलं आहे. रोज नवीन फार काही घडत नसलेल्या कुठच्याही खेड्यात ’ देऊळ ’ , त्याभोवतीचा ’पार ’ ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. लग्नकार्य असो, सुख दु:ख असो , सण समारंभ असोत , वायफळ गप्पा असोत की गावातले महत्त्वाचे निर्णय असोत – श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या डोलाऱ्यावर उभ्या राहिलेल्या या विश्वाचे किती रंग , किती ढंग !! या ग्रामीण भागातील लोकांचे जनजीवन चित्रीत केले आहे ’देऊळ ’ मधे. गिरीश आणि उमेश कुलकर्णी यांच्या वळू, विहीर या चित्रपटानंतरचा सध्या गाजत असलेल्या देऊळविषयी लिहीत आहेत तन्वी देवडे – कुलकर्णी …. “
ही या पुरवणीवरची सुरूवात पहाता आपण कोणितरी आहोत की काय गड्या असे वाटून गेले क्षणभर
त्यानंतरचे कव्हर स्टोरीचे हे पान….
ही पोस्ट पेपरमधे आली, पेक्षाही ती या सुंदर पद्धतीने आली याचा खरच मनापासून आनंद वाटतोय मला.
कृषीवलमधे आलेली पोस्ट इथे पहाता येइल.
दैनिक कृषीवलचे संपादक श्री. संजय आवटे, श्री. अशोक अडसूळ व ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचवणारे श्री. नवनीत कांबळे या सगळ्याचे मन:पुर्वक आभार!!!
आणि काय लिहिणार … अतिशय ’सहजच’ म्हणून सुरू असलेला हा ब्लॉग नित्यनवे आनंदाचे क्षण व माझीच मला नवी ओळख, जगण्याचा हेतू देत असतो … और क्या कुछ नही बस हम खुश है!!!
गोठलेली नाती…
एक स्वप्न …. त्या स्वप्नात , माझी एक मैत्रीण नुकतीच आई झालेली आहे…. तिचं ते काही तासाचं असलेलं पिल्लू मी डोळे भरून पहातेय… मधेच एखादी नजर त्या मैत्रीणीकडे जातेय…. तिच्या चेहेऱ्यावरच ते तृप्त स्मित माझ्या चेहेऱ्यावर उमटतय…… मी बोलतेय काहितरी त्या मैत्रीणीच्या आईशी……
संपलं स्वप्न….
सकाळी उठून नवऱ्याला सांगितलं ,म्हटल काय गंमत आहे बघ, का पडलं असावं असं स्वप्न अधेमधे एकदम!!!
“अरे वा ऐश्वर्या तुझी मैत्रीण आहे सांगितलं नव्हतस तू….. नाही कारण, तुझी कुठली मैत्रीण आहे अशी जिला मुलं नाहीयेत ??? आणि हो आता त्या स्वप्नाचा अर्थ लावत बसू नकोस…. त्याऐवजी आज आपल्या धन्य डोळ्यांना,मनाला कसं बॉम्ब, युद्ध, चोर दरोडेखोर, पिस्तुलं यापैकी काहिही न दिसता सृजनाचं स्वप्न दिसलं याचा आनंद मान
“
त्याच्यापुरता विषय संपलादेखील …..
मी आपली नेहेमीप्रमाणे सकाळची नेटवरची हजेरी लावायला आले तो फेसबूकावर एका मित्राचा मेसेज पाहिला…. एका मैत्रीणीला मुलगा झाल्याचे सांगणारा तो मेसेज होता!!!
निव्वळ ’योगायोग’ म्हणून मला माझे स्वप्न सोडवेना…. intuition या आघाडीवर मी बरी असले जरा तरी गेले अनेक वर्ष ज्या मैत्रीणीशी एक शब्द बोलणेही झाले नाही तिच्याबाबत मला ही अशी पुर्वसुचना का मिळाली असेल हा प्रश्न होताच मनात!!!!
प्रत्यक्ष बोलणे न होणे पण व्यक्ती मनात असणे ह्या तश्या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत पुर्ण कल्पना आहे मला. माझ्या मनात अथांग ’पसारा’ आहे हे ही मी मागेच कबूल केले आहे. तरिही असे नेमक्या वेळेस नेमक्या व्यक्तीची आठवण येते याची नेहेमीच गंमत वाटते. किती आठवणी, भेटलेले लोक, दुरावलेले (शब्दश: नव्हे तर भौगोलिक अंतराने ) मित्र मैत्रीणी सतत मनात त्यांची हजेरी लावून जात असतातच…… एखादी जागा, एखादा क्षण असे अचानक चमकून जातात मनाच्या पटलावर….. ’का’ हे आठवले असावे याची कारणं शोधत बसण्यात अर्थ नसतो…..
मित्र/ मैत्रीणींबाबत तर हे नित्याचेच …. मित्र आणि मैत्रीण यात त्यांचे स्त्री/ पुरूष असणे ’मैत्री’च्या आड न येऊ देणे याकडे नेहेमीच कटाक्ष असतो माझा आणि तो तसा असावाच…. तो मुद्दा नाहीचे आत्ता!!!
मात्र माझ्या या अत्यंत लाडक्या मैत्रीणीला मी विसरले नव्हतेच म्हणजे…. विसरणारच नव्हते…. ’मैत्री’ ची व्याख्या आपण जगलेलो असतो काही जणांसोबत, आयूष्य समृद्ध करणारी मैत्री… जगात तू कुठेही जा, एकटी नाहीयेस हे सांगणारी मैत्री…. अशीच माझी ही मैत्रीण…. अंतर किती वाढले होते/ आहे आमच्यात….. मी माझ्या आयूष्यात गर्क ती तिच्या…. कॉलेजानंतरचे सुरूवातीचे काही दिवस पत्र/ मेल्स पाठवले गेले , हळूहळू सगळेच थांबले…. मनात अचानक आठवण यायची…. ती आठवण दरवेळेस चेहेऱ्यावर समाधान आणणारीच असायची!!!
माझ्या नवऱ्याचा मुद्दा बरोबरच होता , माझ्या साधारण समवयस्क सगळ्याच मैत्रीणींच्या घराचं गोकूळ कधीचेच झालेले होते…..मग माझ्या या मैत्रीणीबाबत अजून हे गोकूळ व्हायचे बाकि आहे ही जाणिव मला होती का ?? कधीतरी वाटलेही तिला फोन करावा आणि विचारावे… पण हे वाटणं अगदीच स्पष्ट नसतं बरेचदा, उदबत्तीचा धूर कसा दिसावा न विरून जावा तसे विचार मनात येतात न वलयांकित असे अस्पष्ट होत विरूनही जातात…. तसेही काही प्रश्न विचारू नयेत, ते वैयक्तिक असतात म्हणून नव्हे कारण मैत्रीत अनेक अधिकार असतात किंबहूना समोरच्याला दुखावले जाऊ नये या उद्देशाने…..
असे काही घडले की एकूणातच मैत्री या शब्दाचा अर्थ आणि व्याप्ती जाणवू लागते…. एक ’तरल’ संवेदनशील नातं….. एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखं…. ’प्रवाह’ हा शब्द यासाठी की…. हा नितळ, स्वच्छ असू शकतो…. काही मित्र/मैत्रीणींबाबत तो आटूनही जातो…. काही वेळा दिशा बदलतो…. तर काही वेळा चक्क दुषित होतो……प्रवासात या प्रवाहाला अनेक लहान मोठे प्रवाह येऊन मिळतात… मित्रपरिवार वाढत जातो…. एखाद्या वाटेला आपण होऊन बांध घालतो, अडवतो मुख्य प्रवाहात येणारा एखादा लहानसा नकोसा प्रवाह …. अव्याहत चालते हे सारे चक्र!!!
प्रवाहाच्या सगळ्याच शक्यता गृहित धरल्या तर मग ही अशी वर्षानूवर्षे बोलणे नसलेली तरी आजही मनातली प्रत्येक आंदोलनं न संकोचता बोलता येऊ शकणारी मैत्रीची स्थानं कश्यात टाकावी समजेना…. वाटलं हे नातं ’गोठलेलं’ असतं नाही त्या प्रवाहात…. तिथेच थांबलेलं तरी स्वत:च अस्तित्व राखलेलं….. आयूष्यातले आनंदाचे दु:खाचे कढ त्या गोठलेल्या नात्याला पार विरघळून टाकू शकतात…. प्रवाह पुर्वीसारखा वहातो काही काळ, पुन्हा गोठण्यासाठी….. एक खात्री देऊन जातो मात्र की ’जिवंत झरा’ आहे मैत्रीच्या तळाशी खोल एक …..
प्रेम, आधार, धडपडायची मुभा, चुकायची मुभा, त्या चूका सुधरवण्यासाठी वेळ देण्याची तयारी, अपेक्षांचं ओझं नसलेली, आपल्याला आपण आहोत त्या रूपात स्विकारणारी , खंबीर पाठिशी उभी रहाणारी एखादी मैत्री, आपल्याला प्रश्न पडतो नं कधी कधी की ’दुनिया पागल है या फिर मै दिवाना/नी’ तेव्हा ठामपणे दुनियेला पागल ठरवणारी मैत्री …… त्या मैत्रीबाबत अनेक आठवणी असतात मनात…. त्यात अशी एखादी भर आणखी पडते मग….. काही काळ आपण थबकतो त्या गोठणं विसरून वाहू लागलेल्या प्रवाहाशी….हिमनग आठवतो मग असा… वरकरणी स्तब्ध, अंतर्यामी कितीतरी दडवून ठेवलेला…..
गोठणं हे काहीवेळा अपरिहार्य असतं याची कल्पना असते पण ती सल नसते आता…. खात्री पटते मनाची कारण हा प्रवाह आटणार नाहीये कधीच!!!
अंतर वाढतं पण काही हात सुटत नसतात आणि काही नाती तुटत नसतात हेच खरं
दोर…..
स्वत:वरून जग पाहू नये माणसानं…. म्हणजे चांगलही नाही नं वाईटही नाही….. आपण चांगले म्हणून जग चांगलं असं वाटलं की अपेक्षाभंग आलाच…. आणि तुम्ही वाईट असाल तर बोलायलाच नको नाही का!!!!
चांगलं वागलं कोणी नं की लगेच नको असतं पाघळायला…. तूला खोडच ती भारी… जरा कोणी दोन शब्द गोड बोललं की लागली पुन्हा भजनी…. मग घालतात लोकं लाथा….
जुनं कसं गं विसरतेस पटकन… सोडून देणं सतत अगदी….. लोक गैरफायदा घेतात नं!!!
नसता भोळसटपणा नसतो कामाचा….. लोकं ओळखतात सगळं… घडाघडा बोलू नये….
मदत करताना समोरच्याला खरच गरज आहे का, जाणिव आहे का विचार करावा…..
काही पटलं नाही तर बोलावं ….. मनात मनात ठेवू नये…. कोणाला नाहीये वेळ, तुमच्या मनातं आत्ता नक्की काय हे कोडं सोडवत बसायला…. स्वत:चच समजेना लोकांना तुमची कोण कशाला करेल पर्वा….
ओळखीची लोकं ओळखी देत नाहीत… कशाला खी खी करून परक्यांशी हसायचं…. नाही पडत त्याला पैसे हा युक्तीवाद नकोय…. लोकांना हल्ली कडवट चेहेरे करून बसायला आवडतं…
जग बदललय, स्वार्थी बाजार आहे सगळा…. माणुसकी हरवलीये…गुन्ह्यांच प्रमाण वाढतय…. नाकासमोर चालणारे लोक आहेतच कुठे???
एक ना दोन….. आपण ऐकतो नं की सल्ले नावाच्या वाक्यांचे धबधबे वहातात अगदी!!!!!सगळेच काही मनात कुठला हेतू ठेवून कुठे दिलेले असतात… बरेचदा आपल्यालाही कळकळ पटतेच… आपण अडलेलो असतो , चिडलेलो असतो , हरलेलो असतो….. कुठेतरी रुजतात हे सल्ले मग, हो ना , देव जाणे …. मनाचा गोंधळ उडतोच ……’तुम्हाला अक्कलच नाहीये कसं वागावं’ हे वाक्य खरं वाटायला लागतं!! त्यात सगळे सल्ले पटावे, खरे वाटावे अशी माणसं आजूबाजूला गर्दी करून असतात….. त्यांच्यातून काढायची असते वाट…. घाबरायला होतं !!!
एक दिवस मग कोणितरी अनोळखी माणूस हसतं, उगाच…. ओळखं काय तर चेहेऱ्यावर चेहेरा पडतो आपला लागोपाठ एक दोन दिवस नुसता…. आणि अचानक आपलाच चेहेरा साथ सोडल्यासारखा, एरंड प्यायल्यासारखा हसतच नाही….. समोरचा चुकल्यासारखा निघून जातो नं आपल्याला प्रश्न पडतो…. हे असे का???
सल्ल्यांनी घेतला की काय मेंदूचा ताबा??? आपला चेहेरा आता आरश्यात आपल्याला अनोळखी वाटणार…. धूळ साठायला लागली आता प्रतिबिंबावर!!!
लोकांचा ढोंगीपणा सापडायला लागलाय… बोलतात एक करतात वेगळं हे प्रकर्षानं लक्षात येतं हल्ली… तोंडावर साखरेत घोळून बोलतात पण मागे तितकेसे चांगले मत नाही आपल्याबद्दल हा ही साक्षात्कार…. मतलबाचा मागोवा काढता येतो आता…. सगळं समजतं आताशा…. फसवायचं नाही हं, भाबडेपणाला हळुहळू तिलांजली देण्यात येतीये!!! आनंद का नाहीये मग, तो कुठे लोपलाय…. ही प्रगती की अधोगती मग…. बोध, आत्मज्ञान वगैरे की गूंते वाढताहेत नुसते….
त्याच रस्त्यावर आपल्याच विचारात पुढे जावं ,समोर असतात शाळेत जाणारी चिंटीपिंटी पिल्लं, त्यांच्या त्या मोठ्या बॅगा…. जिना चढताना मुलं बॅगा पुढे ओढताहेत नं बॅगा त्यांना खाली खेचताहेत…. नकळत त्या बॅगला आपल्या हाताने मागून आधार दिला जातोय….. जिना संपतो, ते पिल्लू मागे वळुनही न पहाता शाळेत पळतं!!! मगाशी आपल्या चेह्ऱ्यावरच हरवलेलं हसू पुन्हा नकळत उमटतं!!!
काहितरी उमलतं…..
पुढे यावं दुकानात जावं….. दुकानातलं दुध नेमकं संपलेलं असतं…. अकरा वाजता येइल दुकानदार सांगतो….. देवा रे, चहाचा दुसरा कप गेला की रे माझा…… दुसरे अनेक ब्रॅंड्स आहेत दुधाचे पण ते नको मला…..मनाशी चुचकारतच दुकान सोडलं जातं….. घरातली कामं सुरू मग, ते सुटताहेत होय….. आपण कामांना लागतो आणि दारावरची बेल वाजते…. कोण आलय सकाळी सकाळी ….. मगाच्या दुकानातला माणूस, त्याच्या हातात दुधाचा कॅन ….. चेह्ऱ्यावर स्मितहास्य…. म्हणतो दुध घेऊन येणारी गाडी लवकर आली आज, मग म्हटलं तूम्हाला घरीच आणून द्यावं दुधाचं कॅन ….. किती आनंद होतो मला…. खूप मोठी नाहीये बाब नाही का… पण स्वत:हून आला ना हा , मला मिळणार नं माझा लाडका चहाचा दुसरा कप आता….
काय म्हणतील लोकं आता ’बिझीनेस स्ट्रॅटेजी’ …नाहितर कोण कशाला असं वागतय….
तरिही, साधा किराणामालाचा दुकानदार तो, त्याला कशाला हवीये स्ट्रॅटेजीची समीकरणं आणि भलेमोठे शब्द असले!! म्हणजे हा अनूभव ’माणूसकीच्या’ खात्यात टाकावा किनई… म्हणजे मला तरी तेच वाटतय, पटतय!!!
माझीच हरवलेली ओळख कुठे सापडेल तो रस्ता सापडल्यासारखं वाटतय…… आरश्यातल्या प्रतिबिंबावरची धूळ झटकावी असं काहिसं अचानक वाटावं अश्या वेळी
दिवाळी सुरू आहे….. यावर्षी काहिही नवे घ्यायचे नाही हा मनाशी केलेला संकल्प…. पण मुलांना जरा सैलावलीयेत बंधनं…. खूप काही नाही पण त्यांच्या गरजेसाठीचीच एखादी वस्तू घ्यावी म्हणून गाठलेला मॉल….. एक लहानसं दुकानं, मोठ्या मॉलच्या जिन्याच्या बाजूला असलेलं….. हसतमुखाने होतं इथे स्वागत…. माझा जीव इथे जास्त रमतो…. आत मॉलात जास्त वस्तू असतीलही पण त्या घ्या असा आग्रह कोण करणार, घ्यायची तर घ्या नाहितर राहूद्या चा परकेपणा नुसता….. मुलाचा जरा हिरमोड होतो पण…. त्यांचा दोष नाही झगमगाट आणि ’खरी चमक’ यातला फरक समजण्याचं त्यांच वय नाही…. पटलं इथे तुझं घड्याळ तर घे नाहितर मॉल आहेच हा दिलेला पर्याय त्याला…. एक दुकान झालं, मग दुसरं , मग दुसऱ्यातून पुन्हा पहिलं….. बरीच झाली घड्याळं पाहून… त्याला काय हवय त्याला नक्की माहिते…. तो हळूच विचारतो आई तुझं बजेट कितीये? आई आणि दुकानदार यांची नजरानजर होते , दोघेही हसतात…. आई सहज विचारते, “भय्या पाकिस्तान से हो ? ” …. नाही म्हणतो तो, सांगतो मी केरळचा आहे आणि महाराष्ट्रातच जन्म झालाय…. गप्पा होतात मग जरा आपूलकीने…. मुलाला एक घड्याळ आवडतं, आईचं बजेट ओलांडतं आता…. दुकानदाराची ओळख आहे नं आता
…. खरेदी आटोपते, मुलगा पुढे निघतो दुकानदार मागून मुलाला हाक मारतो , घड्याळ्याच्या किमतीतून काही पैसे काढून मुलाच्या हातात ठेवतो आणि सांगतो मामाकडून दिवाळीची भेट आहे, काहितरी घे स्वत:ला……
कुठल्यातरी गावचा, कोणाचंतरी दुकान सांभाळणारा कोणितरी अनामिक ’मामा’ पण भाच्याची दिवाळी उजळवून गेला!!! ही सुद्धा ’बिझीनेस स्ट्रॅटेजी’ म्हणायची का आता??? असेलही पण त्या भाच्याला नाही माहिती हा शब्द, तो तर खुश आहे अगदी…. अज्ञानात सुख असावं ते खरं!!!
पुढच्यावेळी याच दुकानात जाणार का आपण…. मग वाटतं कदाचित हो किंवा नाहीही…. एक धडा शिकायला मिळालाय पण की वस्तू विकत मिळतीलही पण ’आनंद’ असा सहज देता येतो….किती असतील हे असे वस्तू विकणारे नं आनंद फुकट देणारे लोक, एकूणातच प्रमाणाने कमी… पण आहेत हे नक्की!!! अकारण चांगलं वागू शकतात लोकं….. स्वार्थाविना एखादा चेहेरा हसवू शकतात लोक!!!
मग त्या समस्त स्वार्थी, शिष्ट वगैरे वगैरे लोकांच काय??? त्यांच काय त्यांच काही नाही… वाट चूकलेले पांथस्त सारे….. अधोगती, अध:पतन वगैरे शब्द असेच आले असतील का??? आणि आता आलेच आहेत तर ते सार्थ ठरवण्याची जबाबदारी खांद्यावर असल्यासारखी वागतात लोकं, झालं!!!! एक खोल खोल दरी असते त्यात कमीअधिक रसातळाला असतात हे, मग खेचतात बाकिच्यांना खालती!!!
सल्ले देणारे ,सावरणारे धरून ठेवतात आपल्याला उतरणीवर , नाठाळाच्या माथी काठी हाणायला सांगतात!!!
चांगले लोक काय मग? त्यांच कार्य काय???
….. आपल्यासारखे असतात नं, गोंधळणारे, खाली उतरणारे….. त्यांना दोर टाकून वर ओढण्याचे काम करतात हे चांगले लोक!!! त्यांच काम त्या दोराचं… एखाद्याची घसरण थांबवण्याचं….
माझ्याकडचा आरसा आता मात्र लख्ख होतोय…. ’निर्हेतूक ’ हा शब्द पुन्हा येतोय डिक्शनरीत!!! स्थिर असल्यासारखं वाटतय…. घसरण थांबवलीये नं….
चटकन हसू शकतो चेहेरा आता….. रस्ता आहे अर्थात पुन्हा ठेच लागेलही, खड्डाही यायचाच एखादा…. घसरायला झालं की नवा दोर शोधायचा फक्त… सोप्पय… आपल्यासारख्या काठावरच्यांना हाच पर्याय उरतो तसाही!!!
एक जुनं आवडतं गाणं पुन्हा मनात येतय…..
No matter what they tell you,
What you believe is true!!!
No matter where they take us ला मात्र जोरात ओरडावसं वाटतं we’ll find our own way back!!!!
कारणं , I can’t deny what I believe…. I can’t be what I’m not !!!!!!
देऊळ…. तू झोप मी जागा आहे…..
अबूधाबी फिल्म फेस्टिवल मधे मराठी सिनेमा, तो ही उमेश आणि गिरीश कु्लकर्णी या जोडगोळीचा….. प्रथमच परदेशात असं थिएटरमधे जाऊन मराठी चित्रपट पहायला मिळणार होता….. नाना पाटेकर, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, सोनाली कु्लकर्णी, खुद्द गिरीश कु्लकर्णी, ज्योती सुभाष सगळे दिग्गज त्यात अतिशा नाईक, विभावरी देशपांडे, उषा नाडकर्णी, किशोर कदम वगैरे तमाम मस्त मंडळी आणि पहिल्यांदाच मराठीत नासिरूद्दीन शहा
….. मराठी मने धावत हा चित्रपट पहायला न गेली तरच नवल!!!
प्रत्यक्ष सिनेमाची वेळ …… ओपन थिएटर…. अरबांनी मराठी माणसाचं मराठी सिनेमासाठी केलेलं स्वागत ….. खुर्च्या मांडलेल्या ,समोर भव्य भव्य स्क्रीन, एका बाजूला सुप्रसिद्ध Grand Mosque मधे संथ वाहणारा पाण्याचा प्रवाह आणि एकीकडे मराठी मंडळी काही आंतरराष्ट्रीय पाहूण्यांसोबत पहात होती त्यांच्या मातृभाषेतलं ’मराठी देऊळ’
चित्रपटाची ओळख करून देण्यात आली…. अभिजीत घोलप बोलले आणि मग ’उमेश विनायक कुलकर्णी’ आले बोलायला…. ’नमस्कार’ म्हणून केलेली सुरूवात आणि “भारताच्या सिनेमाची ओळख मुख्यत्त्वे बॉलीवूड अशी होते पण प्रांतिय भाषांमधेही उत्तम कामगिरी होतेय आणि तसाच माझा एक प्रयत्न की माझ्या mother tongue मधे ’मराठीमधे’ आणतोय ’देऊळ’ ” हे मत दोन्ही आवडलं !!!
भव्य पडद्यावर वाळूच्या कलाकृतीतून साकारणाऱ्या श्रेयनामावलीतून सिनेमाची सुरूवात!!! हळुहळू उलगडू लागलेली कथा….. कधी चेह्ऱ्यावर लहानसं तर कधी जरासं मोठं हास्य, हलक्याफूलक्या पद्धतीने विषय मांडला जातोय याची खात्री देणारे…. ’दमदार’ अभिनय, ताकदीचे कलावंत , सशक्त कथा, त्यासाठी घेतली गेलेली मेहेनत, अत्यंत सुंदर वस्त्रावर बारिक जरीकामातून अप्रतिम नक्षी उमटावी इतक्या तन्मयतेने टिपलेले बारिक तपशील , अगदी नेमकी वातावरणनिर्मिती या सगळ्याचा परिपाक एक खिळवून ठेवणारी कलाकृती असते याचं उदाहरण समोर होतं जणू….. हे जे काही आपल्या समोर घडतय ते इतकं खुसखूशीत आहे की आपण काय अगदी ’शुन्य मिनिटात’ याबद्दल लिहू असे वाटू देणारी सहजता समोर…..
’देऊळ’ ….. देवळाचं राजकारणं…. राजकारणी, दांभिक खोटी, पापभिरू, प्रसंगी स्वार्थी, संधीसाधू माणसं आणि जोडीला गुरूदेव दत्त ,पिंजऱ्यातला देव…..गावातल्या लोकांचा भोळेपणा आणि बेरकेपणा यातला फरक सुक्ष्मतेने टिपत तो तंतोतंत उभा करणं हा ’उमेश कु्लकर्णींचा’ हातखंडा!!! इथे तर जोडीला ’नाना पाटेकर’ , भाऊ असा काही उभा केलाय नानाने की विचारता सोय नाही…. दिलीप प्रभावळकरांचा ’अण्णा कुलकर्णी’ अतिशय संयत, संवेदनशील ….. देवळाच्या राजकारणाला विरोध असणारे अण्णा , सगळा ’बाजारूपणा’ सहन न होणारे अण्णा….. अभिनय हा अंगात मुरलेला असणं, कसं असतं याची ही सगळीच विद्यापीठं!!! ’मोहन आगाशे’ , का कोण जाणे पण असं वाटलं की त्यांच्या वाट्याला आलेली भुमिका त्यांच्या कुवतीच्या मानाने लहानशी होती का?? अर्थात ती चपखल चोख झाली यात वादच नाही…..
अभिनय हा कणाकणातून येतो , नाना (भाऊ) टोलनाक्यावर टोल देतानाचा प्रसंग आवर्जून सांगावा वाटतोय इथे…. टोल ’देऊ का’ यावर गावातल्याच पण त्या टोलनाक्यावर काम करणाऱ्या मुलाने ’नका देऊ’ म्हटल्यावर ’देतो नाss!! ’ म्हणतानाचा चेह्ऱ्यावर अत्यंत बेरकी हावभावांसह पैसे घेतलेल्या हाताचं पुढे-मागे होणं, निव्वळ अप्रतिम….. वळूतला प्रसंग आठवतोय, डॉक्यूमेंट्रीला तुम्ही नाही जायचं, डॉक्यूमेंट्रीच इथे येइल सांगितलं जात असताना ’मोहन आगाशे’ धोतराच्या निऱ्या घालताहेत आणि म्हणताहेत ’अस्सं ss ‘ !!! ’कसं काय जमतं बुवा हे असं इतकं भुमिकेत समरस होणं ??? ’ असं सामान्यांना विचारात टाकणारे प्रसंग हे!!! केश्याला ताप भरलाय त्याला पहायला गावातल्या बायका येताहेत , त्यांच्या जागा कश्या बदलतात हे ही पहाणं रंजक, सरपंच (अतिशा नाईक) आल्यानंतर बाकिच्यांनी सरकून तिला जागा करून देणे वगैरे अनेक अनेक ’बाप’ प्रसंगांची रेलचेल आहे नुसती!!!
इरसाल तरूण मंडळी…. नोकऱ्या न करणारी… कुठल्याही रस्त्यावर गावकुसाबाहेर असू शकणारी एक टपरी हा त्यांचा अड्डा…. त्यांच्यातला एक कवी, त्याला दिले गेलेले ’पोएट्या’ हे नावं, प्रसंगी दिशाहीन वाटणारी ही मंडळी आणि त्यांच्या चर्चा त्यांची पात्र अगदी उभी करतात…. गावातल्या स्त्रीयांच रटाळ मालिकांमधे गुंतलेलं असणं, त्यासाठी त्यांचं घरातल्या लोकांनाही विसरणं, वातावरणनिर्मीतीत उणीव राहिलेली नाहिये!!!!
सोनालीची ’वहिनी’ , अतिशा नाईकची ’सरपंच’ , उषा नाडकर्णीची ’सासू’ , ज्योती सुभाष यांची ’केशाची टिव्हीत आकंठ बुडालेली आई ’ सगळंच मस्त एकदम!!
कोणा एका प्रसंगावर लिहू म्हटलं तर संपुर्ण सिनेमाच फ्रेम बाय फ्रेम लिहावा लागेल….. राजकारण्यांचे बदलते रंग, देवाची महती सांगणारे प्रसंग द्या नाहितर घडवा सांगणारा पत्रकार ’महासंग्राम’ (किशोर कदम) , देवळापुढची रांग, देऊळ होण्याआधिच देवाचं सुरू झालेलं राजकारण, वहात्या गंगेत हात धूऊन घेण्याची माणसाची वृत्ती…. देऊळ झाल्यानंतर घरांमधे बदललेल्या फर्निचर, आणि अंगावर बदललेल्या कपड्यांसहित मनाचीही रंगरंगोटी झालेली माणसं…… नितिमत्ता, मुल्यं सगळ्यात सहजी बदल घडवू शकणारी माणसं!!!!
देवाचा, देवस्थानाचा, देवाच्या वस्तूंचा बाजार,धर्माचाच बाजार आपल्याला नवा नाही…. असे अनेक जागृत ’देवस्थानं’ आपल्या गल्लीबोळातही आहेत…. त्यामागच्या माणसांची, तिथल्या मंडळींची,देवळांबाहेर पुजेचे साहित्य, प्रसाद, देवाच्या गाण्य़ांच्या कॅसेट्स विकणाऱ्या लोकांची मानसिकता, त्यांच्यातल्या हरवलेल्या भक्तांचा , एकूणातच हरवत चाललेल्या ’निस्वार्थ भक्तीचा’ शोध पुढच्या अनेक प्रसंगांमधे येतो….. ’देवा तूला शोधू कुठं’ गाणारी गावातली साधी भजनी मंडळी ’थ्री इडियट्स’ च्या चालीवर देवाची गाणी बसवत असताना पाहिली की ,देवाचा बाजार करू शकणारी माणसं समोरून पहाताना कितीही बोचली तरी कुठे न कुठे आपणही त्या ’सिस्टीम’चा भाग आहोत ही खंत मनात दाटते…..
अण्णा सगळं असह्य होऊन मुलाकडे निघतात, भाऊ (नाना) त्यांना भेटायला येतात तेव्हा त्या दोघांमधला संवाद अत्यंत बोलका आहे…. तुम्ही अनेक गोष्टी बेकायदेशीर करता आहेत, कायदा एक न एक दिवस तुमच्यापर्यंत पोहोचेल या अण्णांच्या मताला नानाने दिलेले उत्तर खूप काही सांगून जाते, “अलिकडे आम्ही आहोत पलीकडे कायदा आणि आमच्या मधे भक्तांची रांग आहे!!! कायद्याने आम्हाला गाठायचे ठरवले तर भक्तांच्या भावना दुखावतील!!! ” हे वाक्य परिपाक आहे सगळ्याचा….. आपल्या ’भावना’ इतक्या अलवार झाल्या आहेत की त्याचा गैरफायदा लोक आपल्या स्वार्थासाठी घेतात हे लक्षात येउनही आपण उपाय शोधायला तयार नाही, हे कटू सत्य!!!!
केश्या (गिरीश कु्लकर्णी), दत्ताचा ‘साक्षात्कार’ झाल्यापासून ते देऊळ उभं रहाण्यापर्यंतचा एक प्रवास आणि आधि अण्णांच म्हणणं पटलं असलं तरी त्यातला अर्थ समजल्यानंतरचा, ’ करडी’ गायीच्या मृत्यू नंतरचा , देवळात देवालाच शोधायला निघालेला, गोंधळलेला ,त्रागा करणारा केश्या हा एक प्रवास…. गिरीश कुलकर्णींने अक्षरश: अत्यंत सहज पेललाय हा प्रवास….. वळू,गाभ्रीचा पाऊस, गंध, विहीर नंतर पुन्हा एकदा गिरीशचा अत्यंत दमदार अभिनय आहे इथेही!!
’करडी’ गायीला रानोमाळ शोधणारा , स्वत:च हरवलेला केश्या आता पडद्यावर असतो, इथवर येत एक प्रश्न पडतो , नासिरूद्दीन शहा कुठेय??? चित्रपट कोणाचा आहे हे माहित असल्यामूळे अत्यंत संवेदनशीलतेने हाताळलेला शेवट असेल ही कल्पना असते पण प्रत्यक्षात तो शेवट काय असेल याचा अंदाज मात्र अजिब्बात बांधता येत नाही…. काय असेल कलाटणी??? प्रेक्षक अस्वस्थ होतात मग कुठेतरी आणि चित्रपटाचा शेवट होतो….. गुंतवून ठेवणारा शेवट… आपण थक्क, आवाक, सुखावलेले की सुन्न झालेले ….हा शेवट हा ’देवळाचा’ ’कळस’ आहे!!!!
यातली गाणीही निश्चितच आवडणारी आहेत….. ’दत्त दत्त’ तर एक सत्य अत्यंत सोप्पं करून सांगणारं आहे!!!
एक सत्य सांगून गेलेला चित्रपट , झोपलेल्यांना जागं करू पहाणारा….. कोणासाठी आहे हा सिनेमा तर देवळांच्या रांगांमधे उभे रहाणाऱ्यांसाठी, मुर्तीत देवाला शोधू पहाणाऱ्यांसाठी, ’दुपारी देवळाचं दार बंद’ पाहून कधीतरी वैतागलेल्यांसाठी, आपण रांगेत असताना कोणितरी व्हीआयपी आल्यावर आपला अजून खोळंबा झालेल्यांसाठी, इथे चपला ठेवा म्हणून देवळाबाहेर अंगावर येणाऱ्या लोकांचा कधितरी देवदर्शनात अडसर वाटलेल्यांसाठी, देवाची गाणी सिनेमाच्या गाण्यांच्या चालीवर आलेली आम्हाला पटत नाही असे घरच्या चर्चेत सांगणाऱ्यांसाठी , देवाचा बाजार झालेला असून त्यात सहभागी होणाऱ्यांसाठी, इंटरनेटद्वारे देवदर्शन करून पुण्य कमावणाऱ्यांसाठी ….. थोडक्यात ’देव’, ’देऊळ’ , ’भक्ती’, ’श्रद्धा’ म्हणजे नक्की काय हे विसरलेल्या आपल्या सगळ्यांना हवीये अशी एक ’सणसणीत’ चपराक त्यामूळे आपल्या सगळ्यांसाठीच!!!!
शुन्य मिनिटातच काय पण मोठा वेळ घेऊनही मनातलं ’देऊळ’ असं कागदावर, स्क्रीनवर उतरवणं शक्य नाहीये ….. भारतात, महाराष्ट्रात हा सिनेमा अजून यायचाय आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सांगून समजणारी ही गोष्ट नव्हे, तिची अनूभूतीच घेतली पाहिजे…. त्यामूळे तुर्तास सल्ला फक्त एक की ’देऊळ’ पहायला विसरू नका!!!!
एकम् ….
मिलिंद बोकिलांच ’एकम्’ पहिल्यांदा वाचलं….. मग कसं देव जाणे पण पुस्तकं हरवलं….. तेव्हा मी भारतातच होते त्यामूळे चटकन पुन्हा नवं पुस्तकं घेऊन आले…. आणावं वाटलं की आणावंच लागलं!!!! आणावचं लागलं जास्त योग्य ठरेल इथे….. हवय मला ते पुस्तक माझ्याकडे कायम….. वपुंची पुस्तकं कशी ठेवतो आपण संग्रही…. कधीतरी काही प्रश्न भेडसावतात, आपला अर्जून होतो आणि आपण त्या पुस्तकांना शरण जातो किंवा कधी असेच ’सहज’ ….. कारणं काहिही असो ही पुस्तकं दरवेळेस नव्या आयामात भेटतात…. भेटू शकतात, काहितरी नवे गवसते…. जुने काहितरी बदलते….. तेच तसेच घडले ’एकम्’ वाचताना……
एकम् मला का वाचावसं वाटतं याची कारणमिमांसा स्वत:शीच मांडायची ठरवलं तर त्यातली ’देवकी’ मनात येणारे विचारांचे आंदोलन पेलते… ते विचार ती बोलू शकते, स्पष्ट अगदी….. तिला ते सगळं असं स्वच्छ पहाता आणि शब्दांमधे मांडता येतं…. मग मला ’देवकी’ पटते!!!
पुस्तक वाचायला लागलं की देवकी हळूहळू मनाची पकड घेऊ लागते…. तिच्या रोजच्या जीवनातले तिच्याकडे येणाऱ्या कामवाल्या वगैरे प्रसंगांचे वर्णन चटकन संपून देवकी विचार करू लागावी असे वाटते…. कारण तिच्या विचारांच्या प्रवाहामधे गुंतवून ठेवण्याचे सामर्थ्य आहे!!
तिचं ’पिणं’ मला खटकतं, इतक्या हूशार व्यक्तीला कशाला हव्यात अश्या कुबड्या असं विचार मनात येतो ….. बरेच स्पष्ट उल्लेख मातृभाषेत करायचे आपण टाळतो….. बरेच मुद्दे हे ’माईंडसेट’ मुळे आपल्याला पटत नाहीत तसंच काही देवकीच्या त्या एका सवयीबद्द्ल मला पहिल्यांदा एकम् वाचताना वाटलं!!!!
शहरापासून दुर एका फ्लॅटमधे रहाणारी ’देवकी’ ही एक नावाजलेली लेखिका…. ’एकटी’ रहाणारी पण lonely नसणारी…. एकटेपणा ही निवड असणारी…. वाचन, लिखाण, स्त्री , पुरूष, लेखक, लेखिका वगैरे अनेक मुद्द्यांवर स्वत:ची ठाम मतं असणारी , मुलावर जीव असणारी, मैत्रीणींकडे मन मोकळं करणारी… माणसाच्या स्वभावातले गुणदोष बारकाईने टिपू शकणारी आणि त्यामागची कारणमिमांसा पाहू शकणारी देवकी …..
देवकी समजत असताना तिची मुलाखत घेणारी मुलगी येते…. इथे बोकिलांची उपस्थिती जाणवते….. लेखनाचा पुढचा मोठा प्रवास या मुलाखत घेणाऱ्या मुलीच्या संगतीने होतो…. पण तिचे ’नाव’ कुठेही येत नाही…… ’शिरोडकरचे’ नाव कसे शेवटपर्यंत येत नाही आणि त्याविना काहिही अडतही नाही…. पण ही मुलाखत सुरू होते आणि मला एकम् खऱ्या अर्थाने आवडायला लागतं…..
संवाद हा ओळींमधे न उरता मनावाटे मेंदुपर्यंत पोहोचायला लागला की समोर पांढऱ्यावर जे काळं झालेलं असतं ते ’आवडतं’!!! पुस्तक म्हणूया का की ती पात्र/व्यक्ती म्हणूया, जे काय ते, पण एका प्रवाहात त्यांना समांतर ’ओढीने’ आपण वाहू लागतो!! मग त्या पाना-पानांमधे लिहीलेली ’गोष्ट’ आपल्याला दिसू लागते, पहावेशी वाटते हेच लेखकाचं ’यश’ असावं!!
एकटेपणाची जी काही व्याख्या, शोध ,त्याचा लेखनाशी संबंध मांडला गेलाय… निव्वळ अप्रतिम!!!
देवकी म्हणते….
तुमचं भांडवल एकटेपणा असतं,सुभद्रा. त्याच्यावरचं व्याजही एकटेपणा. तेच तुम्ही पुन्हा गुंतवायचं असतं . तुम्ही एकटेपणा साठवता. एकटेपणाच्याच घागरीने. आणि साठवून मुरवता. आणि त्या मुरवलेल्या एकटेपणाची ती जी मधूरा बनते नं, ती तुम्ही पीत असता एकट्यानंच. आणि ती अंगात मुरते पुन्हा तुमच्या एकट्याच्याच. तुमच्याभोवती काळोख पसरतो एकटेपणाचा. आणि प्रकाश असलाच ना, तर तोही एकटेपणाचाच. त्या काळोखाची शाई तुम्ही ओतता आपल्या लेखणीत. आणि लिहीता एकटेच. लेखन ही एकट्याची, एकट्यानं, एकट्यासाठी करायची गोष्ट आहे. लोकांचा काही संबंध नाही. ही गोष्ट ज्या दिवशी लोकांना समजेल, तो दिवस आमच्या भाग्याचा, सुभद्रा.
तुम्ही लोकांना त्यात कशासाठी घेता मग? कशासाठी आवृत्त्या काढता? कशासाठी प्रदर्शनं?
आम्ही लोकांना नाही घेत. आम्ही त्या एकेकट्या वाचकाला घेतो. म्हणून तर पुस्तक लिहीतो. पुस्तक ही एका वेळी , एका माणसानं, एकट्यानं वाचायची गोष्ट आहे.लोकांचा काय संबंध त्याच्याशी?
वाचताना , देवकीला ऐकताना बरेचवेळा वाटतं की असच काहीसं होतं का माझ्या मनात…. मग पुन्हा जाणवतं असेलही पण ते अस्पष्ट होतं, धुसर होतं…. देवकी कॅन सी ईट क्लिअर!!!! देवकी शोध घेतेय…. तिला बोध व्हायला हवाय….. ती म्हणते,”बोध कसला व्हायला पाहिजे त्याचाच बोध’!!!
आपण सगळेच जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासात कुठल्यातरी अज्ञाताच्या शोधात फिरतो की.प्रश्न प्रश्न आणि त्या प्रश्नातून जन्माला येणारे नवे प्रश्न…. देवकी ते सोडवू पहाते….. तो शोध घ्यावासा देवकीलाही वाटतोय!!! स्त्री- पुरूष , लेखक , लेखकाच्या लेखनाची पद्धत, अनेक मुद्द्यांवर देवकीचं भाष्य आहे….. कधी प्रकट कधी मनातली आंदोलनं!!!
शोधाचा शोध….. काय शोधायचेय त्याचा शोध….. येणारे विचार कधी स्त्रीच्या नजरेतून यावे…. कधी ते स्त्री-पुरूष वगैरे भेदाच्या पुढे जावेत….
एखादं पुस्तक वाचताना लिंक ब्रेक होत नाही तेव्हा ते लिहिताना लेखकाने काय केले असावे असा विचार येतो!!! आपण आपल्या मनात येणारे विचार असे ’एकटाकी’ लिहू गेलो आणि त्या विचारांचा काही भाग कालांतराने उतरवू पाहिला तर तो तसाच ’सुसंगत’ येइल ??? विचारांचा ’बेस’ तो असेलही कदाचित पण शब्द , वाक्यं, काही मतं बदलतीलच की….. मग आपण मुळचा फ्लो कंटिन्यू करू शकू??? प्रश्न पडतात मग वाटतं ’देवकी’ संचारतेय आपल्यात….. की एक ’देवकी’ असतेच आपल्या सगळ्यांमधे….. की जे जे पुस्तक, सिनेमा आपण आवडले म्हणतो ते केवळ ह्यासाठी की त्यातले पात्र आपला आरसा ठरतात काही अंशी…..
ही देवकी आपल्याला विचारात पाडू शकते हे नक्की….. काहीतरी सुचत नसूनही काहितरी गवसल्यासारखे वाटते…. वपू वाचताना होते तसे!!! लेखकाचं कौतूक वाटतं मग!! वाचताना मधेच एखादं वाक्यं इतरांपेक्षा जास्त चमकतं…..
ती स्वत:शीच हसली. हा दिवस पण एकटा आहे. काळाच्या अनंत प्रवाहात एकलकोंडा. आणि क्षणभंगुर. बारा तेरा तासांचं तर आयुष्य. आपण याच्यापेक्षा फार बरे. असे किती दिवस बघतो. एखादा नाही उगवला मनासारखा तर सोडून द्यायचा. मग दुसरा घ्यायचा. तो येतोच रात्रीनंतर.
एकेटपणा- रिकामपण…. सामान्यत्व नाकारू पहाणाऱ्या एका हुषार लेखिकेचा शोध आणि प्रवास…. उण्यापुऱ्या ७४ पानांच पुस्तक!! दर वाचनात वेगळं वाटतं!!
त्यातला न रुचणारा भाग म्हणजे ’पिणं’ …. हे पुस्तकाच्या पहिल्या वाचनात प्रकर्षाने बोचलं होतं!!! तरिही आपण पुस्तक का वाचतोय आणि काहितरी आपल्याला गुंतवून ठेवतेय हे कोडं वाटलं होतं!!! दुसऱ्या वाचनात पुन्हा एक विचार ’चमकला’ की हे न आवडणारे उल्लेख आहेत पोकळी भरण्यासाठी केल्या जाणाऱ्या सोयीचे….. ही सवय, व्यसन कोणाला नाही…. रटाळ मालिका पहाणं, गॉसिप करणं,वेळीअवेळी उगाचच फेसबूकच्या पानावर डोकावणं ….. पोकळी भरण्यासाठी काहितरी सगळेच करतात की!! देवकीचं ’पिणं’ symbolic असावं का असं वाटतं मला मग!!
मुलाशी मनमोकळा ’संवाद’ साधू शकणारी आई हे देवकीच आणि एक रूप!!!
देवकीचा शेवट … आणि तो येताना तिने ’एकटेपणाच्या’ प्रश्नाची केलेली उकल….. मुळात ’एकटेपणा’ नसतोच हा शोध….. शोधाचा- शोध …बोधाचा- बोध…. आपल्या चेह्ऱ्यावर एक मंद स्मित येऊ घातलेले … शांत बसावेसे वाटायचे क्षण… शुन्यात नजर आणि शुन्य विचार, अपुर्ण तरिही ’पुर्ण’ वाटण्याचे क्षण…… एक पुस्तक ’वाचून ’ संपलेले पण मनात उतरलेले… उरलेले!!!!
नुकतच ’शाळा’ वाचून संपलेलं असतं…. ’मुकुंदाच विश्व’ ताकदीने आपल्या समोर उभे असते….. तितक्याच दमदारपणे ’देवकी’ पहाता येते…. एका लेखकाने ’लेखिकेचे’ भावविश्व सक्षमतेने मांडलेले असते आणि मग मला ’ एकम्’ आवडतं!!! आणि मिलिंद बोकिलांची बाकि पुस्तकं खूणावू लागतात…. वाचाव्या वाटणाऱ्या लेखकांच्या यादीत बोकील वरचा नंबर पटकावतात!!!!














































ताज्या प्रतिक्रिया