जो मुंतजिर न मिला वो…

शाळेत प्रांगणात शतकपूर्ती महोत्सवाच्या निमित्ताने दहावी बारावीतल्या गुणवंतांच्या लागलेल्या मोजक्या फोटोंमध्ये तुझाही फोटो आहे हे आनंदाने सांगणारी मित्रमंडळी फोन – मेसेज करू लागली आणि ‘सोहळ्याला जायला जमणार नाही’ ह्या माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून लेक मला शाळेत घेऊन गेला…

२०२२ ची अखेर… आत्तापर्यंतचं वर्ष काही वेदनेचं, काही आनंदाचं, अचानक उद्भवलेल्या आजारपणामुळे बरंच थकव्याचं, रुटीन, मोनोटोनस वाटावं असं असतानाच शाळेतला फोटो आणि माझ्या फोटोबरोबर मित्रमंडळींनी अभिमानाने स्वतःचे काढलेले फोटो येऊ लागले तसं घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. तब्येत बिघडली तर बघू, मी आहे ना असं म्हणून लेक हट्टाने आईला गावी घेऊन गेला… फोटो पाहिला, शाळेत, मित्र-मैत्रिणींसोबत, शाळेत मिरवणाऱ्या फोटोसह कौतुकाने फोटोसेशन झाले… सगळ्या शिक्षकांचे मनातल्या मनात ऋण मानले… आपला फोटो इथे असण्यात त्या सगळ्यांचा किती मोलाचा वाटा आहे ह्या जाणीवेची समृद्धी मनभरून उतरली…

नासिकला परत निघताना दुपार झाली आणि मनापासून इच्छा असूनही शिंदे बाईंना भेटायचं टाळलं… पुन्हा कधीतरी निवांत येऊया असं स्पष्टीकरण का कोण जाणे पण त्या गाफील क्षणी मनाला दिलं… “बाईंना तुला भेटायची खूप इच्छा आहे. तुझ्या पुस्तकांबद्दल त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे… गावातून फार दूर निघालेली नसशील तर आत्ताही परत फिर आणि जा बाईंना भेटून ये…” मित्राचा फोन आला… नाही फिरले परत… दुपारी बाईंना त्रास द्यायचा नाही आणि सवडीने भेटायला यायचं हे पुन्हा मनात ठरलं…

डिसेंबर अर्धा सरताना मित्राचा पुन्हा मेसेज आला, ‘जायला हवं होतंस परत त्यादिवशी… बाई गेल्या आपल्या…’ …

आमच्या शिंदे बाई… बाईंच्या वर्गातली मुलं चौथीपर्यंतच एकत्र पण बाईंबदलच्या आदरयुक्त प्रेमाने आजतागायत जोडलेली… आजही भेटताना आमच्या असण्याचा, संवादाचा बाई एक महत्त्वाचा भाग… बाई गेल्या म्हणजे नेमकं काय वाटतंय, काय निसटून गेलं हे उमजून यायला मग खूप वेळ गेला… दिवस त्याच्या गतीने पुढे सरकत असताना मुलांना सहजपणे बोलले, “मोबाईलवर रेकॉर्ड करून ठेवायला हवी तुमची मस्ती… अभ्यास करताना लक्ष एका ठिकाणी का नसतं तुमचं?”

दिवस संपला आणि आठवली बाईंची दुर्बीण. कितीतरी वर्षांनी पुन्हा आठवली… आजकाल सगळ्यांकडेच असते ती कॅमेऱ्यात वगैरे… पण बाईंच्या दुर्बीणीचा धाक होता, ती ‘भारी’ होती…

इयत्ता तिसरीचा वर्ग, बाई सांगत होत्या, ”माझ्याकडे नं एक वेगळीच मस्त अशी दुर्बीण आहे, त्यातून मला तुमच्यापैकी प्रत्येकाच्या घरात डोकावता येते. तुम्ही अभ्यास करता की नाही, नीट जेवता का, आईला त्रास देता का, गृहपाठ करता का, शाळेतून घरी गेल्यावर घरात पसारा करता का? वगैरे सगळं मला दिसत असतं….. रोज काही मी प्रत्येकाच्या घरी पहात नाही हं… पण लक्ष असतं माझं…”

’बाई आम्हाला पहायचीये ती दुर्बीण…’ म्हणणाऱ्या आम्हा प्रत्येकाला मग सांगितलं गेलं की तुमच्यापैकी जो कोणी चौथीत वर्गात पहिला येणार त्यालाच ती दुर्बीण पाहायला मिळणार…

मला पहायचीच होती ती दुर्बीण… बाईंच्या घरात गोदरेजचे कपाट होते एक. त्या कपाटात होती ती दुर्बीण, बाईंनीच सांगितलं होतं तसं… त्या कपाटासमोरून जातानाही आतली दुर्बीण आपल्याकडे पहातेय असे वाटायचं… बाईंच्या मुलीला आम्ही सगळे ताई म्हणायचो, ताईला हळूच सांगून पाहिलं होतं एकदा की दुर्बीण दाखव नं आम्हाला. ‘चौथीत वर्गात पहिली ये… आईच दाखवेल तुला दुर्बीण’, म्हणून ताईने पळवून लावल्याचं आजही स्पष्ट आठवतंय 🙂.

टेलिस्कोपसारखी ती दुर्बीण घेऊन बाई एकेकाच्या घरात पहाताहेत, हे दृष्य मीच माझ्या कल्पनेत तेव्हा कितीतरी वेळा पाहिलं होतं. घरात दंगा करताना कधीतरी दुर्बीण विसरायची. आठवली की वाटायचं भिंतीला डोळे आहेत, त्यांच्यापलीकडे बाई आहेत, पहाताहेत आपल्याकडे. स्वत:चं एकदम शहाण्या मुलीत रूपांतर व्हायचं… ती मुलगी मग अभ्यास करायची… बाईंना आनंद वाटेल असंच आपण वागलं पाहिजे असं वाटावं इतक्या बाई आवडायच्या… बाईंचा राग कधी आलाच नाही… घरात छान वागणाऱ्या मुलांना त्यांच्याकडे जास्त खाऊ मिळायचा. मला तर नेहेमीच. म्हणजे नक्की दुर्बीण होतीच हा विश्वास पक्का झाला होता…

मधली सगळी वर्ष आता डोळ्यासमोरून सरकत गेली…. या सगळ्या वर्षांच्या एका बाजूला मी आणि दुसरीकडे बाई. चौथीत पहिला नंबर आल्यावर बाईंकडे जायलाच हवं होतं. पाचवीत शाळा बदलली. तरीही जायलाच हवं होतं. आला होता नं पहिला नंबर, मग हक्काने ते कपाट उघडायलाच हवं होतं…

बाई होत्या उंचीला लहानश्या. आत्ताच्या माझ्या उंचीपेक्षा नक्कीच कमी. शाळेत त्यांच्या साडीला कायम हात लावून पहायचे मी. चिमटीत पकडली ती साडी की चूरचूर आवाज यायचा. मी तो आवाज ऐकण्यात रमले की कधीतरी बाई हसून रागवायच्या, खेळ थांबव तुझा आणि गणितं घे सोडवायला. साड्या तश्याच नेसत असतील की बदलला असावा पॅटर्न बघायला हवं होतं. चांगलं वागलं की बाई बक्षीस द्यायच्या, आयुष्याचा विचार करता ग्रॅटिट्युडच वाटतो, बाई बघतच होत्या म्हणजे माझ्याकडे. मी मात्र वळून पहायला विसरले. बाई किती बेमालूम फसवलंत आम्हाला दुर्बीणीच्या नावाने, त्यांना म्हणायला हवं होतं. त्यांना पुन्हा एकदा स्वच्छ, नितळ हसताना आपणही जुन्या निरागसतेने हसायला हवं होतं…

……………

ग्रुपवर दुसऱ्या दिवशी बाईंचा फोटो आला… तेच तसंच स्वच्छ हास्य… फोटो पाहिला आणि मनातलं मळभ दूर झालं… त्यांचं हसणं माझ्या चेहऱ्यावर उमटायचं तसं पुन्हा उमटलं. छानच वाटलं एकदम… काही माणसं जात नाहीत… ती आपल्या जगण्याचा भाग असतात. एखाद्या प्रसंगात हे प्रकर्षाने जाणवतं इतकंच. बाईंचा फोटो आणि शाळेतला माझा फोटो पुन्हा पुन्हा पाहिला… त्या सोबत आहेतसं वाटलं.

‘उशीर करू नये भेटायला, वाटलं की भेट घ्यावी…’ बाई पुन्हा रागे भरल्या… ‘पुन्हा नाही करणार बाई…’ मनानेच मनाशी कबुली देताना डोळे वहायला लागले…

……………

जो मुंतजिर न मिला वो तो हम हैं शर्मिंदा,
कि हमने देर लगा दी पलट के आने में
(मुंतजिर -वाट पाहणे)

२०२३ चा संकल्प वगैरे काही केला नाही… हो पण उशीर करायचा नाही हे तेवढं मनात ठरलंय पक्कं… बाईंची दुर्बीण पुन्हा आठवणीत आली… माझ्या हसण्यात बाई गवसल्या… काहीतरी गमावताना काय कमावलंय आठवत गेलं… दुर्बीण दिसली नाही, दिसणार नाही पण ‘नजर’ आलीये हे खरं…

#MomentsOfGratitude #सहजच

सेटिंग…


महाराष्ट्र टाईम्स, संवाद,
रविवार 19 नोव्हेंबर 2017

मस्कतमधली पाच वर्ष आणि अबुधाबीतली दोन वर्ष, आखातात रूळले होते मी एव्हाना… एरवी भारतात कधीही करावी न लागलेली घरकामं भारताबाहेर प्रसंगी करावी लागतात हे ही सवयीचं झालं होतं. “घरकामाला बाई हवी” अशी तोंडी जाहिरात देऊन तिची वाट पहाणे हे नित्याचे काम सुरू होते…

अशातच एक दिवस, केरवारे आटोपल्यानंतर , घरातली धूळ झटकताना ती निम्मी कपड्यांवर आणि निम्मी चेहेऱ्यावर, केसांमधे मुक्कामाला वसवल्यानंतर मी आता मोर्चा भांडी घासण्याकडे वळवणार तोच दार वाजलं, तश्याच अवतारात दार उघडले तर समोर व्यवस्थित कपड्यांतली, मेक अप केलेली बाई मला विचारत होती की माझ्याकडे मेड हवीये असं समजलं…. ती श्रीलंकन होती आणि आमच्या बिल्डिंगच्या वॉचमनने पाठवलेली होती .

स्कर्ट घातलेली, व्यवस्थित आवरली आटोपलेली ती आणि अजागळ अवतारातली मी, सगळा विरोधाभास होता. नाकापेक्षा जड असलेल्या त्या मोत्याला मी दारातूनच परत पाठवलं….

एका मैत्रीणीशी गप्पा मारताना सहज बोलले , पूर्वी आमच्याकडे बिल्डिंगला बांग्लादेशी वॉचमन होता तेव्हा येणाऱ्या मेडही बांग्लादेशीच होत्या आणि आता श्रीलंकन वॉचमन आलाय तर येणाऱ्या मेडही श्रीलंकन असतात !!

मैत्रीण अगदी सहज बोलली , “अरे सेटिंग होता है इन लोगोंका !! ” …

’सेटिंग’ शब्दावरचा जोर आधी सामान्य वाटला पण त्याच्या नेमक्या अर्थाचा बोध झाला आणि कसंसं झालं क्षणभर ….. काही गोष्टींबाबत एकतर मी मठ्ठ तरी आहे किंवा जाणूनही दुर्लक्ष करत असते…. बरेचदा या गोष्टी माझ्या खरच लक्षात येत नाहीत किंवा जाणवल्यातरी आपला नेमका अश्या बाबतीत काय संबंध हे न उमगून मी त्याबद्दल चर्चा करायचे टाळत असते.

असे एकेकटे रहाणारे वॉचमन, येणाऱ्या मेड यांच्याशी माझी होणारी चर्चा म्हणजे, “घरची आठवण येते का ? ” ,”कधी जाणार परत ? ” वगैरे स्वरूपाची असते. त्यापुढे जाउन काही बोलायचे, विचार करायचा तर त्यांना काही मदत हवीये का वगैरे इतपत माझी मजल जाते. या सगळ्यांशी गप्पा मारणे होते माझे नहेमी, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या काही कोपऱ्यांबाबत एक अलिप्त तटस्थता असते कायम !!

माझ्या त्या मैत्रीणीशी गप्पा (?) आटोपल्या पण काहीतरी सतत सलत राहिले. एखादी जुनी जखम ठसठसावी तसे…. खपली निघाली होती कुठलीतरी !! नक्की काय ते हाती लागल्याशिवाय मनाची तगमग थांबणार नव्हती ….. मैत्रीणीचे मत हे ’तिचे’ मत होते आणि ते असण्याचा तिला पूर्ण अधिकार होता त्यामुळे त्या मताने मला दुखावले नव्हते. अशी सरळसोट जनरलाईज्ड विधानं मला पटली नाहीत तरी ते करू शकणाऱ्यांचं कौतुक मात्र नक्की वाटतं. बरेचदा असंवेदनशीलतेला जोपासत केलेली धडक विधानं काहीशी बोचतात , आश्चर्यात टाकतात हे नक्की .

विचार येतच होते… माझ्याकडच्या सगळ्या मेड्सबाबत . इथे मेड बदलण्याचे कारण म्हणजे बरेचदा आपण तरी सुट्टीवर जाणे किंवा त्यांनीतरी मायदेशी परतणे असे काहीसे जास्त असते. मात्र ज्या ज्या मेड आल्या किंवा आले ते घरचे एक होऊन गेले कायम हे नक्की !! भारतातच ठेवलेल्या लहान मुलीची आठवण येते सांगणारी हैद्राबादची ’रत्ना’ किंवा मुंबईतल्या दोन मराठी बहिणींची जोडी, बांग्लादेशची ’शेलिना’ , रशिदा…. गुढीपाडव्याला आंब्याचे, कडूलिंबाचे पानं आणून देण्यापासून ते दिवाळीतल्या साफसफाईपर्यंत सगळ्यात लूडबूड करणारे हनाभाई ….. सगळे सगळे आठवत गेले एकामागोमाग एक. बांग्लादेशातलं माश्यांचं स्वतंत्र तळं, भाताची घेतलेली शेतं, भावाचं शिक्षण वगैरे गोष्टी हनाभाई सतत सांगत.

या सगळ्या आठवणींमधे मला ’शेलिना’ आठ्वली आणि जाणवलं त्या सेटिंग शब्दाची बोच नेमकी कुठे उमटतेय. शेलिना ….. माझ्याकडे यायला लागली आणि घरचीच झाली… काम आटोपून माझ्या लहान लेकीशी खेळणे, तिला जेवू घालणे, बोबडे बोल बोलणे वगैरे अनेक कामं स्वत:च हौसेने करणारी शेलिना… दिवाळीच्या तयारीचा मोठ्ठा भाग होणारी बुटकीशी जाड शेलिना.

“चाय बनाऊँ?? आप पियेगा??”, या तिच्या प्रश्नाचा अर्थ “मला चहा हवा” हे मला समजायचं… मग मी सांगायचे मला भुकही लागलीये गं… शेलिनातली शेफ मग सरसावून कामाला लागायची, कांदा लसुण फोडणीत परतून त्यात काबुली चणे आणि भात वगैरे काहीतरी प्रयोग चालायचे… हाताला चव होती तिच्या… चहापान संपताना समंजस हसायची आणि माझ्या लेकीला सांगायची, अपना अम्मी के जैसा बनना…

’मुलूक ’ला जायचं म्हणून प्रचंड खटपट करणारी अशिक्षीत शेलिना . मुलूकमधल्या भावाबहिणींसाठी उमेदीची, तरूणाईची वर्ष आखातात कामाच्या रगाड्यात घालवणारी शेलिना . घरी जाण्याची अनावर आस असणारी शेलिना. “मॅडम मै तो ना आजकल उपरसे कोई प्लेन जाता है तो सोचती हूँ कब जाऊँगी मै इसमे बैठकर 🙂 ” … असे निरागसपणे हसत सांगणारी शेलिना. “मॅडम दुवा करना मेरे लिये…. वगैरे तिची वाक्य मनात घोळत माझ्या….

अनंत खटपटींनंतर एकदाची ती मुलुकला निघाली आणि मी पर्समधे राखलेली सगळी रक्कम बाकी रकमेसह मी तिच्या हातात दिली होती. माझा हसत हसत आणि रडत रडत निरोप घेऊन ’शेलिना’ मुलूकला गेलीही होती. आता कामाला बाई नसणार या दु:खापेक्षा शेलिनाला घरी जायला मिळालं याचाच आनंद झाला होता मला. काही दिवसात तिची मैत्रीण ’रशिदा’ यायला लागली कामाला, मात्र शेलिनाचा विषय कायम यायचा आमच्या बोलण्यात. एक दिवस रशिदाने सांगितले , “मॅडम शेलिनाका शादी हो गया !! ” …. विलक्षण आनंद झाला मला… वाटलं आता तिच्या सगळ्या ओढाताणीचा शेवट गोड होइल. ती तिच्या संसारात रमेल. रशिदाला मात्र अनेकवेळा शेलिनाचा फोन नंबर मागूनही ती देइना .

मला मात्र तिच्याबद्दलचा आनंद तिच्याशी प्रत्यक्ष बोलूनच साजरा करायचा होता. शेवटी ’बांग्लादेशी’ हनाभाईंना गाठलं, म्हटलं बाबारे तिचा फोन नंबर असेल तर दे ना मला, तिचे अभिनंदन करायचे आहे !! …. हनाभाईने माझ्याकडे बघितले , हसला आणि म्हणाला ,” दिदी उसका शादी नही हुआ है….. कभी नही होगा ….. कोइ शादी नही करता इधरसे जाने के बाद ईन लोगोंसे …. मै तो कभी नही करूंगा …. ”

हनाभाई निघून गेला आणि मला विचारात टाकून गेला होता. एक धक्का जो मला एकटीने पचवायचा होता. माझ्या कुटुंबात, आयुष्यात शेलिना एक कामवाली होती . जिला जाताना मी मदत केली त्यामुळे मी तिच्या ’देण्यातून’ मुक्त होते. पण कामवालीशी माझं नातं नकळत आपुलकीचं, माणुसकीचं होतं…. स्त्रीत्त्वाने जोडल्या गेलो होतो आम्ही दोघी. त्या नात्याची वीण घट्ट होती ही मला कल्पना होती पण माझ्या डोळ्यात येऊ पहाणाऱ्या अश्रॄंना माझ्या रोजच्या आयुष्यात फारशी जागा नव्हती. हे असं दुखणं काढणं हे ’व्याह्याची घोडी ’, ’लष्कराच्या भाकऱ्या ’, ’विश्वाची चिंता ’ वगैरे सदरात मोडत होतं.

रोजच्या रामरगाड्यात शेलिना मागे पडली, तिच्यामाझ्यात दोन तीन देशांच्या हद्दी आल्या तरी ती मनातून कधीच गेली नव्हती हे पुन्हा नव्याने जाणवलं मला त्या ’सेटिंग’ शब्दाने. सेटिंग …. दोन वेगवेगळ्या लोकात होणारं सेटिंग हा माझ्या मैत्रीणीचा अर्थ होता, त्यातला एक मला ठणकावून सांगून गेला होता की अश्या बायकांशी मी लग्न करणार नाही, आणि स्वत: मात्र आखातातून आलेला श्रीमंत ’वर’ म्हणून मिरवणार होता. आजवर अगदी ’चांगल्या ’ हनाभाईचं वेगळं आणि प्रातिनिधीक रूप अचानक समोरं आलं माझ्या !!

या सगळ्या सेटिंगमधे दोष कोणाचा हे मला नेमके उमगत नव्हते 😦

अज्ञानात सुख असतं ….. फारसे फंदात नाही पडले की त्रास कमी होतो. पण आपल्या मनाचे ’सेटिंग’ तसे नसते !! शेलिना मला कधीच सापडणार नाहीये… गुगलबाहेरचे जग आहे तिचे, तिचा शोध कसा घेणार ….

आज हा सेटिंग शब्द दिवसभर बोचत रहाणार होता…. पुढचे काही दिवस जाणवणार आणि मग हलकेच मनाच्या कोपऱ्यात दडणार होता…. 😦

खिडकी उघडली आणि बाहेर पहात उभे राहिले….. पांढूरकी घरं, बिल्डिंग्स ,वाळू दिसते माझ्या खिडकीतून, फार नाही पण हे वाळवंट आहे ही जाणिव करून देणारी वाळू ….. ’वाळवंट ’ – एक आत असतं आणि एक बाहेर !! आणि मग अश्या कित्येक शेलिनांचे अश्रॄ , त्याग , कष्ट या वाळवंटाच्या आर्द्रतेत विरघळलेले असतात…. अश्या विचाराने, जाणीवेने माझा ’मोकळा श्वास’ क्षणभर घुसमटला ….. !!

अर्थात ’वाळवंट ’ मग ते वाळूचं असो किंवा भावनांचं तिथे पाझर विरळाच…..

वाळवंटात एक म्हण आहे ’ रेताड वाळवंटात फिरताना तुमच्या नजरेला जर मृगजळ दिसत नसेल तर तुमची तहान खरी नसावी ’ . आज खिडकीबाहेर पहाताना सतत असेच काहीसे वाटतेय , कुठेतरी मृगजळ असावे …. या शेलिनांच्या अश्रॄंना , अस्तित्त्वाला काहीतरी मोल असावे…. कुठेतरी कोणालातरी या सगळ्याची माझ्यापेक्षाही जास्त ’बोच’ वाटावी त्याने हे ’सेटिंग’ बदलावे…..

जो मुंतजिर न मिला वो…

वाढदिवस येत असतात जात असतात, असाच एक वाढदिवस नुकताच
झाला आणि पुढला वाढदिवस गाठण्यापूर्वी करायच्या गोष्टींची यादी लिहून काढली एक. वय वाढतं तसं, ’टू डू लिस्ट’ , ’बकेट लिस्ट’ वगैरे गोष्टींच्या खऱ्या अर्थापर्यंत पोहोचतो आपण. व्यवहाराची जमलेली पुटं गळून पडायला लागली की गाभ्याला स्पर्श करता येतो. आयुष्यात स्थैर्याचा टप्पा येईपर्यंत आयुष्य भिरभिरं करतं माणसाचा… मग वयाच्या एका टप्प्यावर हे वावटळ निवतं आणि त्यातल्या धुळीच्या कणांना ओढ वाटू लागते जमिनीची. नुकत्या लिहीलेल्या यादीतल्या पहिल्या पाचातलं एक स्वप्न, ’गावाकडे जायचं’. हे खरं तर वर्षानुवर्ष मनात तळाशी असलं तरी मनाच्या पृष्ठभागावर इतकं स्पष्ट उमटलं होतं आता. माझं गाव… खरंतर माझा जन्म झाला तेव्हा बाबांची बदली असलेलं हे गाव, पण आयुष्यातली पहिली काही वर्ष जिथे जातात ती असतात जिव्हाळ्याची जीवापासची गावं… जगभर फिरलं तरी परतायच्या वाटेवरची ही गावं. विचाराच्या लाटेवर स्वार होत निघालेल्या, दुरवरून परतणाऱ्या मनासाठीचा ही गावं हा कायमस्वरूपी रहिवासाचा पत्ता असतात.

गाव सोडण्यापूर्वी जणू सांगितलं होतं गावाला….

मैं लौटने के इरादे से जा रहा हूँ मगर,
सफर सफर है, मेरा इंतज़ार मत करना!!

२३ वर्षांनी वळली पावलं गावाकडे ती ही अशी योगायोगाने. ’विशलिस्ट’च्या यादीत अग्रक्रम पटकावून गावाकडे जाणं हा गोल अचिव्ह करणार होते मी. जरासं हुरहुरतं किंवा एकुणातच बावरं आणि खूप उत्सुक मन. काही हरवलेलं शोधायचं होतं…काल सुटून गेलेलं, राहून गेलेलं आजमधे घेऊन यायचं होतं… आजचं माझं ’असणं’ कालच्या ’होतं’ बरोबर वाटून घ्यायचं होतं.

गाव बदललेलं असणार ही खात्री होती. तेवीस चोवीस वर्षात काय काय बदल झाले असतील ते पहाण्याची उत्सुकता, साशंकता वगैरे संमिश्र भावना मनात सतत डॊकावत होत्या. गावात शिरल्यावर एरवी माझ्या रोजच्या रस्त्यावर असणारे मंदीर गाठायचे तर नेमके कसे जावे ह्याचा मनात गोंधळ उडाला आणि पत्ता विचारावा लागला तेव्हा विलक्षण परकेपण, उपरेपण असं म्हणून दाटून आलं की डोळे चटकन पाणावले. संबंध तुटतो आपला… आणि जेव्हा काहीतरी तुटतं तेव्हा एखादा कोपरा बोचरा व्हायचाच, हा तुकडा सामोरा आला की दुखायचंच. याच्या स्पर्शाने जखम होणारही आणि हळूवार मन भळभळणारही… नाळ तुटलेली असते आणि आईच्याच एखाद्या वागण्याने क्षणिक परकेपण जाणवतं तेव्हा त्या क्षणाचं ओझं फार मोठं असतं. असाच एक ’जड’ क्षण अनुभवत होते मी.

जो मुंतजिर न मिला वो तो हम हैं शर्मिंदा,
कि हमने देर लगा दी पलट के आने में!!

गावाने मुंतजिर असणं, वाट पहाणं सोडून दिलं की काय आपली या विचाराने मन दुखावलं…

गावातले बदल सकारात्मक असावेत इतकी माफक अपेक्षा ठेवली मग आणि त्याही आघाडीवर निराश व्हावं लागतय की काय अशी जाणीव खड्ड्यांनी काठोकाठ भरलेले रस्ते देत होते. नजर मात्र नेटाने जुन्या परिचित खुणा शोधत भिरभिरत होती. गावाबाहेर, जिल्ह्याबाहेर इतकेच काय तर देशाबाहेरही मोठा काळ गेला असला आपला तरी मुळं रुजलीयेत इथे या जाणीवेला मन धरून होते. ’असं नव्हतं रे इथे’, ’अरे हा रोजचा रस्ता होता आमचा’, ’हे किती बदललय’, ’हे अंतर तेव्हा किती मोठं वाटायचं’ असं काहीबाही सतत बोललं जात होतं. लहान मुलांसारखं कुतुहल बाळगत गाडीच्या खिडकीतून बाहेर पहाणारी आई मुलांनाही गमतीची वाटत असावी पण ते ही उत्सुकतेने कानाकोपरा पहात होते हे नक्की. ’इथे व्यायामशाळा होती’, ’इथे पीराची टेकडी होती’, ’अमक्याचं घर होतं इथे’ वगैरे उल्लेख वळणावळणांवर येत होते.

भुतकाळाबाबत मन चिवट असतं आपलं… भारताबाहेरच्या वास्तव्यातली स्वच्छता पाहून आल्यामुळे की काय पण नाही म्हटलं तरी गावाने त्याआघाडीवर चांगलीच पिछाडी घेतलेली पाहून मन दुखावलही जरासं. पूर्वी हेच आपलं अवघं विश्व होतं आणि आता आपणच या गावाला प्रश्न विचारतोय या जाणिवेने मन चपापलं. रस्त्यात दिसणारी घरं तीच असली तरी काहींवर दुसरे मजले दिसत होते, ’अंगणं’ तर सगळीच बदललेली होती. ज्या पेरूच्या, आंब्याच्या झाडाने फळांची चव समजली ती झाडंच दिसत नव्हती… ज्या पारिजातकाखाली उभं रहात प्राजक्ताचं शिंपण झेललं होतं, जो पारिजातक आजही मनाच्या मधोमध उभा होता तो पारिजातक जेव्हा दिसला नाही तेव्हा मनावर कसलंसं सावट आल्यासारखं वाटलं. जे अश्रु खूप दिवसात वाट हरवल्यासारखे कुठेतरी दडून बसले होते ते पुन्हा डॊळ्यांत वस्तीला आले… माझ्यासारखेच गावी परतले जणू अश्रुही आज.

आमच्या कॉलनीत गाडी पोहोचली होती एव्हाना. आता समोर घर दिसू लागलं होतं. अनेक वर्षांनी जुन्या गावाकडे आणि त्यातही आपल्या जुन्या रहात्या घराकडे परतताना घर, त्याचा सभोवताल बदललेला असण्याची असते आपली मानसिक तयारी. घर जुनं होणं, काही ठिकाणी डागडूजीची गरज असणं वगैरे मान्यही असतं आपल्याला, पण ते घर होतं त्यापेक्षा खूप छानबिन होणं , अंतर्बाह्य बदललेल्या घराची ओळख हरवणं आणि सगळ्यात क्लेशकारक म्हणजे घर मुळ जागीच असलं तरी ते आता आपल्या ताब्यात नसणं हे मात्र जड जातं पचायला. काही अपरिहार्य कारणाने आता आपलं नसतं ’आपलंच’ घर. बदललेल्या ह्या परिस्थितीचा विचार येतो आणि मनाच्या घट्ट भिंतीचेच काही पोपडे गळून पडतात, एखादा आधाराचा खांब मुळापासून हलतो. जाऊच नये हे बदल पहायला असं वाटतं एकीकडे आणि तरीही मन ओढ घेतं त्या घराकडे. ’नको थांबूया इथे आपण’ मी नकळत म्हणाले…. थांबावं असं वाटत असताना, नाही थांबू असंही वाटत होते.
कब आओगे ये घर ने मुझ से चलते वक़्त पूछा था

यही आवाज़ अब तक गूँजती है मेरे कानों में…

माझ्या अस्तित्त्वाचा मागे सुटुन गेलेला एक मोठा भाग समोर होता आणि आत्ताच्या अस्तित्त्वाला तो जोडला जाईल की नाही इतकं आपलं अस्तित्त्व काळाच्या प्रवाहात बदलत गेलय हे जाणवत गेलं. जिगसॉ पझलचा एक तुकडा सापडत होता खरा पण मुळचं चित्रच बदललय की काय ही जाणीव मनाची घुसमट वाढवत होती.

आजुबाजूच्या घरात माणसं होती… काही नवी आली होती काही जूनी मिटून गेली होती. मी गेले तर त्यांना भेटून मला आणि मला भेटून त्यांना आनंदच होणार होता. पण गेल्या गेल्या क्षणभर का होईना मला माझी ओळख सांगावी लागेल हे लक्षात आलं आणि पाय पुढे सरकलेच नाहीत. नुसतीच उभी राहिले… ती तेव्हाची ’मी’ जिथे तिथे दिसत होते स्वत:लाच… तिला पहात राहिले, तेव्हाच्या तिला सावरून स्वत:कडे बोलावत राहिले. आमच्या घरातून, माझ्याच खोलीच्या खिडकीतून बाहेर पहाणाऱ्या कोणालाही मी जितकी परकी वाटणार होते तितकंच ते बाह्यत: बदललेलं घर मला परकं वाटत गेलं. मैत्रीणीच्या घरासमोर जाऊन उभी राहिले… दार उघडून आत जायचे होते… फाटक ढकललेही आणि मन पुढे सरकण्याऐवजी कितीतरी वर्ष मागे ओढत गेलं… मनाबरोबरच मी ही परतले पुन्हा आमच्याच घराकडे.

भरून आलेले डोळे पुसले आणि पुन्हा उमगलं घराचा आत्मा तेव्हाही तृप्त होता आताही असावा. घराच्या चारही बाजूच्या अंगणात बहरलेली बाग याची साक्ष होती. घराची पायाभरणी आठवली… पायासाठी आणलेले दगड, वाळूचे ढीग, हळूहळू उभ्या रहाणाऱ्या भिंती…लालसर विटांची प्रमाणबद्ध मांडणी, त्यावर मारलं गेलेलं पाणी… ओल्या भिंतींचा सुगंध, त्या भिंतींवरून मारलेल्या उड्या.. एक एक आठवण येत गेली. घर पूर्ण होताना केलेली वास्तुशांत आठवली. हळदीकुंकवाचे आईच्या हाताचे ठसे… वास्तुपुरूष ठेवलेली घरातली जागा, सगळं सगळं लख्ख आठवलं. मन काठोकाठ भरून आलं आणि वाटलं शिरावं या वास्तुच्या कुशीत, भेटावं त्या वास्तुपुरूषाला… सांगावा त्याला गेल्या दोन तपांमधला माझ्या आयुष्याचा प्रवास, घ्यावा त्याचा आशिर्वाद पुन्हा नव्याने.

वाटलं जीव गुंतलाय इथेच आपला… घुटमळतय मनातलं काहीतरी इथेच. या विचाराने मात्र भान आलं, ” कोणी वापरलेली वस्तु घेऊ नकोस कधी, देणाऱ्याचा जीव गुंतलेला असतो” माझं नवऱ्याला नेहेमीचं सांगणं मलाच पुन्हा आठवलं आणि पुढे निघालेली पावलं खिळली जमिनीला. माझा किती जीव अडकलाय या वास्तुत, प्रकर्षाने सामोरं आलं ते. लग्न करून सासरी निघताना ’निरोप’ घेते मुलगी, घराचाही… सगळ्या सगळ्यातून सुटत पुढे जाते. माझंही झालं होतं तसंच पण या ’वास्तु’चा निरोप घ्यायचा बाकी होता. डोळे कितव्यांदातरी पुन्हा भरून येत होते…

माझ्या अडकलेपणाला त्या क्षणी आवर घातला. जड पावलांनी, भरल्या मनाने, भरल्या डोळ्यांनी निरोप घेतला घराचा… ’तुझ्यात आसरा घेणाऱ्या प्रत्येकावर कायमच कृपा असू दे’ मनापासून मागणं मागितलं. वास्तु ’तथास्तू’ म्हटलीच असावी…म्हणणारच होती, मी लाडकी लेक होते त्या घरातली.

घरापासून घरापर्यंत एक संपूर्ण आवर्तन पूर्ण करून वळले. जुन्या सगळ्याकडे पाठ फिरवत परत फिरले… मन शुन्य होतं अगदी. कोरं, निराकार… पाठवणी झाल्यानंतर मुली निघतात सासरी तेव्हा त्यांना काय वाटतं असं विचारलं तर नाही सांगता येत चटकन… अमूर्त भावना व्यक्त नाही करता येत. तितक्यात नवऱ्याने पाठीवर हात ठेवला. माझ्या डोळ्यातल्या पाण्याचं प्रतिबिंब त्याच्याही डोळ्यांत उमटलेलं दिसलं… माझ्या मनातल्या आवर्तनांचा तो मुक समंजस साक्षीदार होता. त्याच्यासोबतीने पावलं पुढे टाकली…पुन्हा नव्याने.

घरं एकाकडून दुसऱ्याकडे जातात तेव्हा दारावरची पाटी बदलते, पायाचे दगड तेच तिथेच तसेच असतात…. अंगणातली झाडं बदलतात, माती बदलत नसते… माझ्या अस्तित्त्वाच्या भिरभिरलेल्या धुलीकणाला त्याची माती सापडली होती… आयुष्याच्या वावटळीला सामोरं जायला आता आम्ही सज्ज होतो…. वास्तुपुरूष पुन्हा पुन्हा तथास्तू म्हणत होता !!

✍🏻 Tanvi Amit
महाराष्ट्र टाईम्स, दिवाळी अंक 2017

झीनी झीनी इन साँसों से ….

’पिकू’ पाहिला, पुन्हा पाहिला… कितव्यांदातरी पुन्हा पाहिला. काही चित्रपट आपण पहातो कितीहीवेळा. सुरूवातीला आवर्जुन थिएटरमधे जाऊन आणि मग त्याचा कुठल्यातरी चॅनलवर प्रिमियर होतो तेव्हाही आणि त्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दोन वर्षांनीही तो जेव्हा कुठल्यातरी चॅनलवर लागतो आपण तो तेव्हाही पहातो. मी ’पिकू’ पहाते तसा, सुरूवातीपासून किंवा मिळेल त्या फ्रेमपासून पुढे.

दर वेळेस जाणवतं अमिताभ नावाचं चार अक्षरात मावणारं पण प्रत्यक्षात अभिनयाच्या सगळ्या व्याख्या संपूनही व्यापून रहाणारं गारूड. हा माणूस ॲंग्री यंग मॅन वगैरे होता तेव्हा मी लहान होते हे एका अर्थाने बरंच झालं, हा आवडला न आवडला काही बिघडलं नाही तेव्हा कधीच. तरूणपणीच्या त्यावेळच्या अमिताभच्या साधारण समकालीन अभिनेत्यांमधे विनोद खन्नाच आवडला अजुनही. ’मेरे अपने’ आवर्जून पाहिला तो त्याच्याचसाठी. शशी कपुरचं हसणं आवडलं आणि काहीवेळेस राजेश खन्नाही… अमिताभ आवडला तो शोलेमधे पण मारामारी करत नसताना, आनंद मधे पूर्णवेळ, मिली मधे सतत… त्याच्या कारकिर्दीच्या सेकंड इनिंगमधे खाकी, आँखे, चिनी कम असे एक एक चित्रपट आवडत गेले ते थेट ’पिकू’पर्यंत. पण हा प्रवास उलटा आहे. तो नंतरचा खूप आवडला आणि आपल्याला नक्की काय आवडतं, काय आवडत नाही हे उमजण्याचा त्यादरम्यान टप्पा असल्यामुळे लहानपणी पाहिलेला ’आनंद’ वगळता त्याचे बाकी चित्रपटही एकापाठोपाठ एक ठरवून पाहिले गेले. या प्रवासाच्या वाटेत सिलसिला, चुपके चुपके असे मैलाचे थांबे येत गेले आणि ’सात हिंदुस्तानी’ आवडत तो सुफळ झाला, संपूर्ण होणं तसं कठीण कारण सत्तरी पार केलेला हा म्हातारा नुकताच ’पिंक’ मधे पुन्हा खूप आवडून गेलाय.

दिपिका आवडली पिकूमधे. फार फार आवडली. अभिनयाला वाव मिळाला की या मुली तो करू शकतात हे सिद्ध झालं की फार छान वाटतं. जिन्स घातलेली असतानाही मोठी ठळक टिकली लावणारी, फारसा ग्लॅमरस कपडेपट नसतानाही विलक्षण आकर्षक दिसणारी पिकू. अमिताभ नावाच्या माणसासमोर इतक्या ताकदीनं उभं राहणं निश्चितच कौतुकास्पद आहे. चित्रपटात जेव्हा जेव्हा ती हसते तेव्हा गोड मोहक दिसतेच पण अभिनयात डोळ्यातून भाव व्यक्त करते तेव्हाही अगदी आवडते. आपल्या विचित्र, विक्षिप्त, हेकट वडीलांची काळजी नाईलाज म्हणून नव्हे तर कराविशी मनापासून वाटते म्हणून करणं, कधी कधी त्यांच्या अतिरेकाने वैतागणं… सगळंच संयत तरिही सुस्पष्ट उमटवणारा अभिनय.

साध्या कपड्यांमधे, नॉन ग्लॅमरस लुकमधे अश्या अनेकजणींनी भूमिका केलेल्या आहेत, त्या आवडल्याही आहेत… मात्र ’जब वी मेट’ची करिना, ’पिकू’ मधली दिपिका, ’नीरजा’मधली सोनम आत्ता हे लिहिताना एकत्र आठवताहेत. ’क्वीन’ हा सगळ्यांना आवडलेला सिनेमा मला स्वत:ला फारसा न आवडल्यामुळे असावं, आणि कंगना ’तनु वेड्स मनू’ च्या दुसऱ्या भागातल्या दुसऱ्या भूमिकेव्यतिरिक्त फारशी आवडत नसल्यामुळे सशक्त अभिनयाच्या या यादीत ती आठवली नसावी. व्यक्तिसापेक्षता लागू पडते ती अशी 🙂

पिकूतलं पुढचं नाव येतं ते इरफानचं. अर्थात अभिनयाबाबत हा गडी फारच पक्का आहेच. ही इज ॲट हीज बेस्ट ॲज अल्वेज. अमिताभ आणि इरफान ही अभिनयाची दोन टोक आणि दिपिका हा त्यांना साधणारा इक्विलिब्रियम असंही वाटतं कधी कधी. संवाद तर सुंदर आहेतच इरफानचे पण या बॅनर्जी कुटुंबाचा विचित्रपणा पहात, सांभाळत न बोलताही तो जे सहज सांगतो ते पहाणं सुखद असतं.

हा चित्रपट पहाण्य़ाचं, आवडण्याचं अजून एक कारण म्हणजे मौशमी :). ही कायमच आवडली मला. अमिताभ आणि मौशमी ही जोडीही नेहेमी आवडणारी. ते मस्त दिसतात एकत्र. ’रिमझिम गिरे सावन’ आठवत नसेल तर मी काय म्हणतेय ते नाही समजणार… मुंबई, रिमझिमता पाऊस, भिजलेले रस्ते, समुद्राच्या लाटा, चिंब भिजलेला सुटबुटातला अमिताभ आणि साध्या आकाशी निळ्या साडीतली मौशमी… एनीटाईम पाहू शकणारी लिस्ट असते ना आपली त्यात माझ्यासाठी हे गाणं कायम आहे. मौशमीच्या नावाचा बंगाली उच्चार, तिचं हसणं आणि हसताना मागे दिसणारा एक लपलेला दात, आवडतेच ही बाई. दातांची अशी ठेवण खूप जणांना आवडते, त्याबद्दल कॉम्प्लिमेंट्स भरपूर मिळतात.. ट्रस्ट मी 🙂 …. तर पिकूमधले अमिताभ मौशमीमधले प्रसंग, मौशमी दिपिकामधले प्रसंग, अभिनय…बिन्धास्त, मोकळे संवाद हा ही चित्रपटातला महत्त्वाचा मुद्दा ठरतो.

कमिंग बॅक टू पिकू, सुजीत सरकारने वेगळाच, तसा फारसा सहज न भासणारा विषय निवडून तो असा नितांतसुंदर मांडला म्हणून त्याचं कौतुक व्हावंच पण पडद्यावर भास्कोर बॅनर्जी, पिकू, राणा ही पात्र वठवण्यासाठी त्याने निवडलेल्या अभिनेत्यांसाठी त्याला विशेष दाद द्यावी वाटते दरवेळेस. असे होते पिंजरबाबत, उर्मिला आणि मनोज बाजपयीव्यतिरिक्त अन्य कोणी तिथे असूच शकत नाहीत, ही पात्र केवळ केवळ त्यांचीच. हेच होते शोलेबाबत, इजाजतबाबत, आनंदबाबत… (इजाजतच्या उल्लेखाशिवाय चित्रपटांबद्दल लिहून पहायला हवं एकदा 🙂 ) .पिकूचा विषय पहिल्यांदा ऐकला, प्रोमोज पाहिले तेव्हा हसू आले होते खरंतर… पण चित्रपटगृहातून निघताना जाणवले होते ’बद्धकोष्टता’ हा चित्रपटाचा विषय आहे असं म्हणणं हा अन्याय होईल. अनेक मुद्द्यांचा सहज सुंदर गोफ आहे, एक साधीशी पण अर्थपूर्ण फ्रेम साधणारा विषयांचा कोलाज आहे हा.

किस लम्हे ने थामी उंगली मेरी,
फुसला के मुझको ले चला ….
नंगे पाओं दौड़ी आँखें मेरी
ख्वाबों की सारी बस्तियां

हर दूरियां हर फासले क़रीब हैं
इस उम्र की भी शख्सियत अजीब है …

पिकू का पहातो आपण बरेचदा, कोणते ’लम्हे’ आपली उंगली थामतात आणि इथे थांबवतात आपल्याला हा विचार केला तेव्हा जाणवलं गंभीर विषयाला हलक्याफुलक्या नितांतसुंदर मांडणीने मांडलं की तो उलट जास्त पोहोचतो हे जाणवतं इथे. अमिताभ आणि दिपिकाने साकारलेल्या वडिल आणि लेकीच्या नात्यासाठी. मौशमीसाठीच नव्हे तर ती आली म्हणून आनंदित होणाऱ्या पिकूच्या काकांसाठी, चिडणाऱ्या काकूसाठी, रघुवीर यादवच्या डॉ श्रीवास्तवसाठी, बोदानसाठी, बंगाली वाटणाऱ्या सगळ्यांसाठीच आणि राणा नावाच्या बोलक्या डोळ्याच्या इरफानला वेगळ्याच रूपात तितकाच विलक्षण अभिनय करताना पाहण्यासाठी. संवेदनशिलता आणि नर्मविनोद हे हातात हात गुंफून जातात तेव्हा काय होतं या प्रचितीसाठी…गाणी, पार्श्वसंगीत, सिनेमातला दिल्लीहून कोलकत्यापर्यंतचा प्रवास हे न चुकवण्यासारखे काही आहे. आईवडिल म्हातारपणी विचित्र वागले तरी त्यांना सांभाळायचं असतं ह्या विचारासाठी, छोटे प्रसंग कधी संवादासहित तर कधी संवादाविना मोठा मुद्दा अधोरेखित करतात हे नव्याने अनुभवण्यासाठी पहावा पिकू… एकदाच नव्हे पुन्हा कधी मिळाला आणि जमलं तर पुन्हा.

जीने की ये कैसी आदत लगी
बेमतलब कर्ज़े चढ़ गए
हादसों से बच के जाते कहाँ
सब रोते हँसते सह गए…

ओळी आठवतात या वेळोवेळी.

आता शेवटाकडे… घर विकणार नाही हा ठाम निर्णय सांगणारी दिपिका आणि मग सायकलवर निघालेला अमिताभ थबकून एका लहान मुलीकडे पहात जातो ती फ्रेम असो की आधी काम सोडून गेलेल्या कामवालीला ’कल से आ जाना’ असं दिपिकाचं सांगणं हा एकूणच सगळ्याचा समंजस स्विकार दर्शवणारा लहानसा प्रसंग… जमलाय हा शेवट. इथे चित्रपट पडद्यावर संपतो आणि मनात येऊन थांबतो… तिथे विसावतो आणि रिलीज होऊन दोन वर्ष झाल्यानंतरही पाहिला तर त्याच्याबद्दल लिहीण्यास भाग पाडतो 🙂

दुर्बीण …

’थांबा तुमची मस्ती अशी नाही संपणार…. मोबाईलला सगळी मस्ती शुट करून ठेवते तुमची …. उद्या शाळेत येते आणि दाखवते तुमच्या टिचरला …. कसे तुम्ही आल्यावर स्कुलबॅग कुठेही ठेवता , टिफिन काढून ठेवत नाही. चार वेळा म्हटल्याशिवाय होमवर्क करत नाही …. आता गेला अर्धातास ओरडतेय मी झोपा रे, झोपा रे…. झोपताय का तुम्ही …. थांबा केलाच कॅमेरा ऑन !! ’

टिचरला कसे गुणी दिसायला हवेय यांना ….आणि आहेतच की गुणी मग विसरतात अधेमधे…. आता कसे झोपलेच चिडीचूप … ही मात्रा बरोब्बर लागू पडलीये. मी कुठे खरं शुट करतेय म्हणा… पण झोपले बाई मुलं एकदाचे शांत….

उद्या नाही ऐकलं तर सांगेन शाळेने कॅमेरेच बसवायचे ठरवलेत मुलांच्या घरी, म्हणजे अधेमधे कधीही पाहिलं नं शिक्षकांनी की दिसेल त्यांना मुलं कसे वागताहेत घराघरात….

………………..

🙂 🙂 …. सगळं आवरून झोपायला जाताना अचानक आठवतेय ती दुर्बीण…. बाईंची दुर्बीण !! कित्ती वर्षांनी आठवतेय ….दुर्बीणीचं नाव बदललय आता, आजकाल सगळ्यांकडेच असते ती कॅमेऱ्यात वगैरे …. पण बाईंच्या दुर्बीणीचा धाक होता, नक्कीच भारी असावी ती.

इयत्ता तिसरीचा तो वर्ग, बाई सांगत होत्या ,” माझ्याकडे नं एक वेगळीच मस्त अशी दुर्बीण आहे, त्यातून मला तुमच्यापैकी प्रत्येकाच्या घरात डोकावता येते. तुम्ही अभ्यास करता की नाही , नीट जेवता का, आईला त्रास देता का, गृहपाठ करता का , शाळेतून घरी गेल्यानंतर घरात पसारा करता का ? वगैरे सगळं मला दिसत असतं….. रोज काही मी प्रत्येकाच्या घरी पहात नाही हं…. मधेच मग अशी कधीही कोणाच्याही घरी डोकावून बघत असते …. ”

’बाई आम्हाला पहायचीये ती दुर्बीण …”

’हो तर , दाखवणार नं… तुमच्यापैकी जो कोणी चौथीत वर्गात पहिला येणार त्यालाच ती दुर्बीण पहायला मिळणार’

मला पहायचीच हॊती ती दुर्बीण काहीही झाले तरी… बाईंच्या घरात गोदरेजचे कपाट होते एक गडद रंगाचे. त्या कपाटात होती ती दुर्बीण, बाईंनीच सांगितले होते तसे …. त्या कपाटासमोरून जातानाही आतली दुर्बीण आपल्याकडे पहातेय असे वाटायचे . बाईंच्या मुलीला सगळे ताई म्हणायचे , ताईला हळूच सांगून पाहिलं होतं एकदा की दुर्बीण दाखवं नं आम्हाला …. ताईने मग बागेतले २-३ पेरू जास्त दिले काढून आणि म्हणाली ,’पळ इथून, आई मला रागावेल… त्यापेक्षा अभ्यास कर आणि पहिली ये चौथीत. ’

टे्लेस्कोपसारखी ती दुर्बीण घेऊन बाई एकेकाच्या घरात पहाताहेत, हे दृष्य मीच माझ्या कल्पनेत कितीतरी वेळा पाहिलेय.

घरात दंगा करताना दुर्बीण विसरली जायची … मधेच कधी आठवली की वाटायचं भिंतीला, छताला डोळे आहेत , त्यांच्यापलीकडे बाई आहेत ,पहाताहेत आपल्याकडे. चपापून जायला व्हायचं !!

बाईंचा राग मात्र कधी आला नाही… बाई आवडायच्याच खूप . घरात छान वागणाऱ्या मुलांना जास्त पेरू मिळायचे. मला तर नेहेमीच . म्हणजे नक्की दुर्बीण होतीच…. नक्कीच…

……………………….

मधली सगळी वर्ष डोळ्यासमोरून सरकताहेत…. या सगळ्या वर्षांच्या एका बाजूला मी आणि दुसरीकडे बाई .चौथीत पहिला नंबर आल्यानंतर बाईंकडे जायलाच हवं होतं …. पाचवीत शाळा बदलली…. तरीही जायलाच हवं होतं !! आला होता नं पहिला नंबर , मग हक्काने ते कपाट उघडायलाच हवं होतं ….!!

चांगलं वागलं की बाई बक्षीस द्यायच्या , आयुष्याचा विचार करता बऱ्यापैकी सुखी समाधानी आहे की मी. घरीदारी चांगलं वागले असावे…. नक्कीच …. बाई बघतच होत्या म्हणजे माझ्याकडे … मी मात्र वळून पहायला विसरले …. जायला हवं आता लवकरात लवकर बाईंकडे … पेरू घ्यायचे हक्काने भरपूर !! आता विचारायचं बाईंना की बाई किती बेमालूम फसवलत आम्हाला दुर्बीणीच्या नावाने…. त्यांना पुन्हा एकदा हसताना पहायलाच हवं !! सांगायचं यावेळेस बाईंना …उरलेलं आयुष्य पुन्हा एकदा तसंच जगायचय , तुम्ही शिकवल्यासारखं . कोण जाणे बाई पुन्हा एखाद्या दुर्बीणीतून बघतील…. नव्हे बघतच असतील… नक्कीच , त्याशिवाय यश मिळणे सोपे झाले नसते.

बाई होत्या उंचीला लहानश्या. आत्ताच्या माझ्या उंचीपेक्षा बऱ्याच कमी . शाळेत त्यांच्या साडीला हात लावून पहायचे मी. चिमटीत पकडली ती साडी की चूरचूर आवाज यायचा. सतत चाळा लागला तो आवाज ऐकण्याचा की बाई ओरडायच्या आता खेळ थांबव तुझा आणि गणित घे सोडवायला.साड्या तश्याच नेसत असतील का अजूनही की बदलला असावा पॅटर्न …. जातेच आता त्यांच्याकडे….

………………….

………………….

बाई नाहीयेत आता….
परवा चौकशी केल्यावर समजलेय !!

दुर्बीण हरवलीये आता , कपाट बंद झालेय कायमचे …

………………….

वागता बोलताना स्वत:कडे आता त्यांच्याच नजरेतून पहाते मी , दुर्बीणीच्या दुसऱ्या बाजूने असलेल्या बाईंसारखी ….

मोठं केलय आता बाईंनी मला ….त्यांनी दिलेली ’नजर ’ आता टिकवून ठेवायची आहे….

उशीर…..

“अगं माउ उशीर झालाय आज तूला यायला, चल आता पटापट हायपाय धूवा आणि जेवायला चला….” शाळेतून आलेल्या लेकीला माझी सल्लेबाजी सुरू झालेली होती…..

’उशीर’ ….सतत येतो हा शब्द नाही आपल्या बोलण्यात…. टाळायचा असतो ना तो, म्हणून त्याचा धाक आणि बागूलबुवा कायम!!!

मला आवरण्याची जितकी घाई साधारण तितकीच माझी लेक निवांत…. “होऊ दे उशीर, तू आधि माझं ऐक…. ” लेकीचा हुकूम!!!

शाळेतून आली ना ही की मला समोर बसवून आधि संपुर्ण दिवसाचं रिपोर्टींग करते , मग बाकि कामाला सुरूवात…. विलक्षण गोड दिसते ती तो वृत्तांत सांगताना म्हणून मी देखील बसते तिच्या समोर…. आज टिचर अमूक म्हणाली, ढमूक म्हणाली वगैरे सुरू होते मग … त्यात गाडं कुठे तरी अडतं, मग ’थांब हं मम्मा, मला याद करू दे’ वगैरे सुरू होतं…. मला समजलेलच असतं काय म्हणायचय ते, मग मी तो नेमका शब्द सांगते…. मग समोरचे डोळे एकदम विस्फारतात…. चेहेरा खुश एकदम, रोजचा प्रश्न, “अगंsssss मम्मा तूला कसं माहितं ??? तू पण माझ्याच स्कूलला जायची??? तूलापण माझीच टिचर होती ???? 🙂 ” …… मी आपलं ठरलेला प्रश्न विचारते, “टिफीन संपलाय का ??? ”

परवा इथवर सगळं रोजच्यासारखचं झालं , या मुलांना रोजचा डबा टिचरला दाखवावा लागतो…. मुलांना डब्यात सकस अन्न दिलं जावं यासाठी शाळा तशी जागरूक आहे…. परवा पिल्लूने मला सांगितले ,” मम्मा मी टिफीन दाखवला टिचरला, ती म्हणाली की गुड फूड ….. 🙂 ” ….. मग काहिसा विचार केला तिने , घरात एक चक्कर मारली आणि परत माझ्यासमोर येउन उभी राहिली नी पुन्हा विचारलं ,” मम्मा एक सांग, जर टिचर नाही म्हणाली की गुड फुड तर  ??? ” ……

खरं सांगते, मी बसल्यानंतर माझ्या होणाऱ्या उंचीपेक्षा जरा उंच किंवा साधारण तितकच उंच असं ते ध्यान असे प्रश्न विचारतं तेव्हा चेहेरा असा काही गंभीर होतो की तो पहाताना आपल्या चेहेऱ्यावर नकळत हसू उमटावे…. तरिही मी आपलं चेहेरा शक्य तितका गंभीर ठेवत, गाल फुगवून म्हटलं ,” मला ना जाम सॅड वाटतं की मी माझ्या पिल्लूला टिफीन दिला आणि तो टिचरला आवडलाच नाही 😦 ” …..

माझ्यामते विषय संपला होता, हातपाय धूणे वगैरे आटोपलं….. पुन्हा पिल्लूच्या घरात एक दोन फेऱ्या झाल्या,आणि पुन्हा धावत ती माझ्याकडे आली , घट्ट बिलगली आणि म्हणाली  “मम्मा अगं तू ते बनाना दिले होतेस ना टिफीनला, तेव्हाही टिचर ’गुड फूड’ असेच म्हणाली होती…. मी फक्त घरी येऊन तुझी गंमत केली होती…. 🙂 ” ………… 🙂 🙂 आता मात्र मला घरातल्या त्या सगळ्या वैचारिक फेऱ्यांच रहस्य उमगलं होतं ….. शाळा सुरू होऊन आता महिना होत आला आहे, आणि शाळेच्या अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी पिल्लूला तिची लाडकी केळी टिफीनमधे दिली होती…. आणि त्यादिवशी टिचरने विचारले होते की तुझ्या आईने केळं का दिलेय टिफीनला ???? ….. त्या एका वाक्याला मी काही तसे लक्षात ठेवलेले नव्हते , पण त्या वाक्याने आपली आई दुखावली असेल का हा प्रश्न किती भेडसावतोय या चार वर्षाच्या डोक्याला…..

“मम्मा चल ना किती ’उशीर’ करतेस , भूक लागलीये … जल्दी जल्दी!!! ” या तिच्या वाक्याने भानावर आले खरे पण खरच किती ’उशीर’ करते मी बऱ्याच गोष्टी समजून घ्यायला…..टिचर ’गुड फुड’ म्हटली की पिल्लूसारखीच मी ही खुश होते, पण जर एखाद दिवस ती तसे नाही म्हटली तर काय यासाठी मी कुठे माझ्या बाळाला तयार करतेय….. बरं समजा तसं झालच तर त्यासाठी माझ्या मुलीने कसं react व्हायचय हे मला तिला शिकवावसचं वाटलं नाहीये…. पिल्लू लहान असलं तरी ते विचार करतय, करू शकतय हेच मला ’उशीरा’ समजलं तर ????

चालतं नाही काही ठिकाणी ’उशीर’ केलेला…. ट्रेनसाठी, बससाठी, नौकरी ऑफिसेसमधे आपण धावत पळत पोहोचतो…. वेळ गाठतो…. ’लेट मार्क’ नकोच बाबा… पुन्हा आपण कसे ’वक्तशीर’ की punctual असा दावा करतो….. पण काही छोटे छोटे ’उशीर’ आपण किती नकळत करतो नाही!!!!

असाच आणि एक प्रसंग… संध्याकाळची मुलं खेळून घरी आली, जेवणं झाली …..माझा रोजचा वाक्यांचा रतीब सुरू झाला…. “चला चला शाळेच्या बॅगा आवरा आता…. पसारे जागच्या जागी ठेवा…. आवरा भराभर…. झोपा चटकन… उद्या शाळा आहे…. झोपायला ’उशीर’ झाला की उठायला ’उशीर’ होतो …. ”

नॉर्मल पट्टीत सुरू झालेल्या घोषणा हळूहळू वरच्या पट्टीत जाइपर्यंत माझी पटाईत पोरं काही दाद देत नाहीत हा अनूभव आता नवा नाही, त्यामूळे मी हल्ली सुरूवातच एकदम जोषात करते…..

त्यादिवशी मुलंही ऐकेनात…. माझं किचनमधलं काम संपायच्या आत मुलांनी झोपायला जावं असा वटहूकूम मी काढला आणि मुलं तसं वागताहेत की नाही याकडॆ एक नजर ठेवली….. ’उशीर’ व्हायला नको या मतावर मी ठाम होते अगदी….. शेवटी मुलं वैतागली आणि म्हणाली, “अगं हो हो… जातोय आम्ही बॅग आवरतोय… पेन्सिल्स ठेवायच्या आहेत आत!!! ”

छे छे पण ….. ’उशीर’ झालाच….. मी ओरडले ,”नकोय काहीच नाटकं , एका सेकंदात मला तुम्ही दोघंही बेडरूममधे गेलेले पाहिजे… मी आवरेन तो पसारा… ” ….. मुलं किचनमधे पाणी प्यायला आली, मला म्हणाली हॉलमधे ये ना थोडा वेळ….. म्हटलं अजिबात नाही, उगाच थोडा वेळ थोडा वेळ करत ’उशीर’ होतो मग झोपा होत नाहीत पुर्ण……

किचन आवरलं, मुलं एव्हाना बेडरूममधे पोहोचली होती…. तिथल्या मस्तीचा आवाज मंदावला होता….. बाबाबरोबर खिदळून झाले असावे त्यांचे असा अंदाज बांधला मी….. घड्याळाकडे नजर टाकली , मस्त वेळेत आवरलय सगळं….. अजिब्बात ’उशीर’ नाही झालेला…… हॉलमधे गेले, पेन्सिलींचा पसारा आवरायचा होता ना……

समोर आले ते हे पेन्सिलींचे पिरॅमिड….. 🙂

ते पाहिले आणि पहातच राहिले…. मुलं धांगडधिंगा घालताना एकमेकांशी संवाद साधताहेत , असं काही रचू पहाणाऱ्या दादाला त्याची धाकटी बहिण मदत करतेय….. त्यांच्या डोक्यात कल्पना येताहेत… आणि सगळ्यात महत्त्वाचे आपण जितके ज्ञान पुरवतो किंवा पुरवू शकतोय त्या पलीकडे झेप घेण्याचे सामर्थ्य दर पुढच्या पिढीत असते…… हे समजायला मला ’उशीर’ होतोय हेच काय ते सत्य!!!

तडक उठले आणि मुलांकडे गेले…. कधी नाही ते मी पोहोचण्याआधिच दोन्ही पिल्लं एकमेकांच्या कुशीत गाढं झोपली होती….. त्यांनी घातलेला ’पसारा’ मला खूप आवडलाय हे सांगायला जायला मला ’उशीर’ झाला होता ……

लहान सहान प्रसंग सतत डोळे उघडतात , पण मेली आपली झापडं भलती गहिरी … आपण सताड उघडेच नाही ठेवत डोळे… त्यांना पुन्हा पुन्हा मिटण्याचा चाळा…. नात्यांमधे, मैत्रीमधे, आयूष्यामधे हा ’उशीर’ चालत नाही हे का मला माहित नाहीये….

किचनमधले काम आणि मुलं यांच्यात निवड करणे ही साधि दिसणारी बाब तशी….’उशीर’ कुठे चालेल आणि कुठे नाही ही निवड जरा ’उशिरा’ केली की आलाच पश्चाताप ओघाने!!!

प्रत्येक ’उशीरा’ला कारणं देतोच नाही आपणं ….. असतात तय्यार आपल्याकडे कारणं …. प्रेमाचे चार शब्द बोलायला ’उशीर, चुकलं तर माफी मागायला ’उशीर’ , कोणी माफी मागितलीच तर माफ करायचा ’उशीर’  , कौतूकाचे शब्द बोलायला ’उशीर’ ……

काय करावे नी कसे करावे….. का मग Better late than never म्हणावे आणि जरा विचाराने वागावे….ह्योच करना पडॆंगा ऐसा लगता है!!!! 🙂

नाही यमाकडे म्हणे ’लेट मार्क’ची सोय नसते , त्याचे दुत त्यांचे काम चोख बजावतात वेळच्या वेळी….. ’उशीर’ न करता.. तेव्हा त्यांनी गाठायच्या आत ’जागो रेssss ‘… 😉