रक़्स करना है तो–


सुख़न -21

एखाद्या वळणावर आयुष्य इतकं गुंतागुंतीचं होत जातं की पायांना चालायला वाट सापडेनाशी होते. चालण्याची इच्छा, सवय असते आणि मग हे पाऊलवाट न सापडणं फार क्लेशदायक अगतिक ठरत जातं… अश्याच एका वळणावर एक शेर भेटीला आला…

देख ज़िंदाँ से परे रंग-ए-चमन जोश-ए-बहार
रक़्स करना है तो फिर पाँव की ज़ंजीर न देख

जिंदॉं म्हणजे तुरूंग… ह्या कैदेच्या पलीकडे निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेले रंग, उमललेली बहार बघ असं पहिल्या ओळीत अर्थाने म्हणणारा हा शेर… पुढील ओळीत, ‘रक़्स करना है तो फिर पाँव की ज़ंजीर न देख’ म्हणतो… नृत्याची अभिलाषा मनात असेल तर पायातील बेडीत अडकू नकोस असं सहज सांगून जातो. मजरूह सुल्तानपुरींचा हा शेर मग आयुष्याचं जणू ब्रीदवाक्य ठरतो…

अर्थात पायातली ही ‘जंजीर’ एक रूपक असलं तरी ही जंजीर नेमकी कसली याचा शोध मन घेऊ पाहतं. परिस्थितीने पायात अडकवलेली की आपल्याच विचारांनी बांधलेली, समाजमान्य चौकटी रुढींची की अन्य कसली परंतु प्रत्येकाच्या पायात जणू एक साखळी नियतीने बांधलेली आढळून येते… कारागृह, कैद आणि पायी बांधलेली ही शृंखला हे रूपक घेऊन कवी आणि शायरांना कायमच व्यक्त व्हावं वाटलं हे सत्य मग मनापाशी पुन्हा पुन्हा येत जातं.

कृष्ण बिहारी नूर यांचा एक शेर इथे आवर्जून आठवतो. शेर म्हणतो…

ज़िंदगी से बड़ी सज़ा ही नहीं
और क्या जुर्म है पता ही नहीं

‘और क्या जुर्म है पता ही नही’, आयुष्य नावाची ही शिक्षा नेमकी का मिळालेली आहे याचं उत्तर नाही म्हणणारा हा शेर. अर्थात शेर दोन ओळीत त्यांच्या प्रकट अर्था इतकंच बोलून सहसा थांबत नाहीत. काव्याचे वेळोवेळी अनेक अन्वय लागणे हेच काव्याचे सौंदर्य. प्रत्येकाला आपल्या अनुभवानुसार क्षमतेनुसार शब्दांचे अर्थ गवसत जातात आणि वेळोवेळी कविता नव्याने पुन्हा उमजत जातात.

अवघ्या जगालाच बंदी शाळा म्हणताना गदिमा देखील सहजपणे ‘जग हे बंदी शाला जो आला तो रमला’, असं लिहितात …

कोणी न येथे मला चांगला, जो तो पथ चुकलेला

ज्याची त्याला प्यार कोठडी
कोठडीतले सखे सवंगडी
हातकडी की अवघड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला…

गदिमा म्हणतात तेव्हा काव्यातील शब्दांची आशय संपन्नता जीवनातील अनुभवांच्या तराजूत मोजताना झळाळून उठते आणि ते काव्य कायम स्मरणात स्थान मिळवून जातं. ह्या अवघड बेडीबद्दल, जंजीर बद्दल फ़ानी बदायूनी लिहितात…

ज़िंदगी जब्र है और जब्र के आसार नहीं
हाए इस क़ैद को ज़ंजीर भी दरकार नहीं

‘जिंदगी जब्र है’, अन्याय तर होतोय पण ‘जब्र के आसार नहीं’, अन्यायाची सकृत दर्शनी लक्ष नाही दिसत नाहीत. अन्याय सहन करण्याची हतबलता इथे अधोरेखित होत जाते. आयुष्य नावाची ही कैद इतकी गमतीशीर की याच्यातील साखळदंड देखील प्रत्यक्षात दिसत नाहीत, शायर म्हणतो. अर्थात ते दिसत नसले तरी मनाला, भावनांना, अस्तित्वाला करकचून बांधून टाकणारे अदृश्य पाश असतात जे माणसांना अपार वेदना देणारे ठरतात.

‘फिर छिडी रात, बात फुलों की’, सारख्या गज़लेत

फूल खिलते रहेंगे दुनिया में
रोज़ निकलेगी बात फूलों की

सारखा विलक्षण आशावादी शेर लिहिणारे मख़दूम मुहिउद्दिन जिंदॉं बद्दल एक शेर लिहितात…

न किसी आह की आवाज़ न ज़ंजीर का शोर
आज क्या हो गया ज़िंदाँ में कि ज़िंदाँ चुप है

‘आह की आवाज, जंजीर का शोर’, तुरुंगातील काही आवाज अगदीच गृहीत धरलेले असतात आणि तेच जगण्याच्या बाबतीतही घडतं. या कैदेत आपली व्यथा मांडताना सहसा माणसं दिसून येतात. क़मर जलालवींचा एक शेर मग आठवतो… पिंजऱ्यात बंद पक्ष्याची उपमा देत आयुष्याविषयी भाष्य करताना शायर म्हणतो…

ज़ब्त करता हूँ तो घुटता है क़फ़स में मिरा दम
आह करता हूँ तो सय्याद ख़फ़ा होता है

माझ्या वेदनेच्या उच्चाराबाबत मी संयम बाळगला तेव्हा या तुरुंगात माझी घुसमट थांबेना, परंतु ज्या क्षणी मी दुःखोद्गार काढले त्या क्षणी मात्र मला या पिंजऱ्यात बंद करणाऱ्याची नाराजी मी ओढवून घेतली. पायातील बेडीचा आवाज, वेदनेचा हुंकार किंवा हताशपणे व्यक्त होणाऱ्या अश्रूंच्या उच्चारापाशी बाबा आमटेंची कविता आठवल्या शिवाय राहत नाही…

शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई
दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही

‘हे गतीचे गीत’ किती मोलाचे असते या निष्कर्षाप्रत माणसं आवर्जून येतात आणि मग मजरूह सुल्तानपुरींचाच एक शेर म्हणतो…

रोक सकता हमें ज़िंदान-ए-बला क्या’ मजरूह’
हम तो आवाज़ हैं दीवार से छन जाते हैं

वेदनेची ही कैद ‘ज़िंदान -ए- बला’, आम्हाला कितपत अडकवून ठेवू शकेल याविषयी आम्ही साशंक आहोत कारण आम्ही ‘आवाज’ आहोत, भिंतींचा अडसर पार करून पुढे जाऊ शकतो.

आयुष्याच्या वाटचालीत एका आखीव सीमारेषेपर्यंतच जाण्यामध्ये कधी कधी शहाणपणा ठरतो. ‘अपनी अपनी हदों मे कैद होते है सब’, हे कैद असणंही अस्तित्वाच्या निरंतर अव्याहत गतीसाठी आवश्यक असतं हेही माणसं जाणून असतात. किनाऱ्यावर आलेली लाट भरतीच्या अखेरच्या सीमेला ओलांडून आली तर त्यातून साध्य परिणाम हा नुकसानच असतो इतकी शहाणीव माणसाला उपजतच असते.

आपल्या जन्माबरोबरच आपल्या असण्याच्या अनेक रुळलेल्या चौकटींचे बंधन आपल्याही नकळत आपल्याला वारशात मिळत जातं. या बंधनांचे पूर्वग्रह घट्ट होत आपणच आपल्या भोवती चौकटीची कैद आखत जातो. कधीतरी शिकता शिकता साधलेल्या लर्निंगला ‘अनलर्न’ करण्याच्या टप्प्यापासून पुन्हा एक नवी सुरुवात होते आणि भोवतीची चौकट उलगडून पक्ष्यांप्रमाणे आपल्याच पंखांचं बळ माणसं आजमावून पाहतात… ‘अपनी ही कैद से आप ही रिहा हो जाना बेहद जरुरी होता है’, माणसं कधीतरी नक्की शिकतात…

आणि मग ग़ालिब म्हणतो…

क़ैद-ए-हयात ओ बंद-ए-ग़म अस्ल में दोनों एक हैं
मौत से पहले आदमी ग़म से नजात पाए क्यूँ

‘कैद – ए – हयात ओ बंद – ए – ग़म’… आयुष्य नावाची कैद आणि त्याला असणारी दुःखाची किनार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मृत्यू हीच यातून सुटका असणार आहे त्यामुळे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ते परिपूर्णतेने जगलं पाहिजे. त्याच्या साऱ्या रूपांना तितक्याच आनंदाने आत्मीयतेने स्वीकारलं पाहिजे…

मौत से पहले आदमी ग़म से नजात पाए क्यूँ

ग़ालिबचं म्हणणं थेट समजतं… पटत जातं…

आणि मग पहिलाच शेर पुन्हा आठवतो…

देख ज़िंदाँ से परे रंग-ए-चमन जोश-ए-बहार
रक़्स करना है तो फिर पाँव की ज़ंजीर न देख

✍🏻 तन्वी अमित

यावर आपले मत नोंदवा