गृहित…

माझ्या धाकट्या पिल्लूच्या शाळेचा म्हणजे नर्सरीच्या मुलांच्या वर्गाचा बक्षीस समारंभ नुकताच संपला होता….. शाळेने अजून एका रंगाच्या युनिफॉर्मच्या बंधनात न अडकवलेली ती चिमणी रंगीबेरंगी फुलपाखरं कार्यक्रम संपल्याचे लक्षात येताच टिचर रागावण्याच्या आत चौफेर उधळली होती….. त्यांच्या दोन्ही तिन्ही शिक्षिका सगळ्यांना रांगेने वर्गाकडे नेण्याच्या प्रयत्नात होत्या…. त्यांच्या प्रयत्नाला काही चिमूरडी साथही देत होती…. दोन तीन धिटुकली मात्र एव्हाना झोके, घसरगुंडीवर पोहोचलीही होती…..सगळाच गोंधळ होतोय की काय असे वाटत असताना त्या टिचर्सनी सफाईने मुलं रांगेत उभी केली आणि पिल्लं निघाली वर्गाकडे….. तिथून दप्तरं उचलायची आणि घरी पळायचं इतकचं काम आता बाकि होतं…… रांगेत कुठेही ढकलाढकली नाही , बेशिस्त नाही….. मोहक दृष्य़ असते ते एक…. अगदीच नाही म्हणायला दोन -तीन मुलं दांडगाई करण्यात मग्न असल्यामूळे त्यांना रांग वगैरे बंधनं नको होती बाकि सगळं व्यवस्थित अगदी ….

तितक्यात माझ्या बाजूने एक गोरा गोरा छोटा दोस्त पळाला…. उन्हाकडे निघालेला तो मुलगा आपल्याच नादात हाताची गाडी चालवत धावत होता….. त्याला उन लागतयं म्हणून न रहावून मी ओरडले शेवटी की बाबा रे तुझी टिचर बोलावतेय वर्गात जा बघू आधि….. कसलं काय नी कसलं काय….. त्याची गाडी काही थांबेना…. शेवटी त्याच्या मागे गेले आणि त्याला जरा रागावूनच विचारलं की ऐकू येत नाहिये का तूला मी ओरडतेय केव्हाची , काही गरज नाहिये उन्हात खेळण्याची जा वर्गात….. पिल्लू गोड हसलं, मी वर्गाकडे जा म्हणून हाताने खूण केली तर चटकन वळलं आणि त्या दिशेला धावलं….

त्याच्या शर्टवर मानेजवळ लोंबकळलेलं काहितरी क्षणभर चमकलं  …… त्याच्या कानातलं लहानसं ’हियरिंग एड’ निघालेलं होतं….. ती लोंबकळलेली वस्तू नेमकी काय ते जाणवलं आणि काय बोलावे मला सुचेना, सुन्नं व्हायला झालं होतं….. माझं बोलणं त्या चिमूरड्याला खरच ऐकू येत नव्हतं…..

’हियरिंग एड’ वगैरे वस्तू ही वृद्धापकाळातली खरेदी हे माझ्या मनाने ’गृहित’ धरलेलं होतं….

सुट्टी सुरू आहे सध्या माझ्या मुलांच्या शाळेची…. नाही म्हटलं तरी पसारा आलाच ओघाने… आपणच वेगवेगळ्या प्रसंगांना घेउन दिलेली खेळणी घरभर पसरतात मग… मुलं एखाद दिवस अशी शहाणी होतात की सारं घरं खेळून झाल्यावर लख्ख आवरूनही ठेवतात पण एखाद दिवस असा काही असतो की मुलांना काहीच ऐकायचं नसतं….. असाच एखादा दिवस मग नेमकी आपलीही काही निमित्ताने चिडचिड झालेली असावी….. नवऱ्यालाही नेमके खूप काम असावे ऑफिसात, अगदी घरी येताना भरपुर ट्रॅफिक वगैरे लागलेले असावे…. मणिकांचन योग सारे जुळून यावे नी त्यात मुलांनी एकमेकांशी फुटकळ कागदाच्या चिटोऱ्यावरुन वगैरे वाद घालावे…. ठिणगी पुरते मग ती …. आई किंवा बाबा कोणितरी एकाने रागवायला सुरूवात करायची, एरवी दुसऱ्याचे काम असते असे प्रसंग निभावून न्यायचे पण आज तो ही फॉर्मातच … मग काय वाक्यांची आतषबाजी नुसती, “सगळं मिळतयं ना यांना म्हणून कसली किंमत नाहीये…. इतकी खेळणी आहेत तर कागदांचे चिटोरे पुरताहेत वादावाद्यांना….. नाही आता ना खेळणी बिळणी काही मिळणार नाहीयेत इथून पुढे…. जास्त मिळालं ना की गृहित धरलं जातं सगळं….इ.इ. ” …

मुलांना कितपत समजतेय, खरचं किती बोलायला हवेय अश्या वेळी वगैरे एरवी शांत डोक्याने करायच्या चर्चा झाल्या……  कधी कधी बोललं जातं हे मात्र निश्चित….  नवऱ्याने ’गृहित’ शब्द वापरला खरा पण मला तो तसाच बोचत राहिला…. वातावरण जितक्या पटकन तापलं तितक्याच चटकन शांतही झालं, आणि मग रागावलेल्या बाबाला सोबत घेउन, आपल्यामूळे बाबा ’sad’ झालाय वगैरे चर्चा करत मुलांनी त्यांचा पसारा आवरलाही…. त्यांच्या पुरता तो प्रसंग संपला आणि आम्ही फिरायला म्हणून बाहेर पडलो…..

बागेत मुलं मस्ती करत होती , नेहेमीचेच खेळ सगळे घसरगुंडी, झोके, पकडा पकडी, बॉल फेकणे वगैरे….. साधी घसरगुंडी विचारात घेऊया आता, मागच्या शिडीजवळची मुलांची रांग…. आपल्याला चढायला मिळाल्यावर चटाचट वर चढणारे आणि मग सुर्र्कन हसत खाली घसरत येणारी मुलं….. विशेष काही कौशल्य लागत नाही यात हे आपले गृहितक , पण खाली घसरून येताना मुलांचे चेहेरे पहाणं किती सुंदर असते वगैरे रम्य विचार मनात येण्याची वेळ ती….. आम्ही बोलतोय एकमेकांशी, सगळी मुलं खिदळताहेत तोच एक बाई तिच्या १०-१२ वर्षाच्या मुलाला घेऊन आली….. तिने त्याचा हात घट्ट धरलेला…. कावरं बावरं ते पोरं पहातक्षणी लक्षात आलं की हे मुल गतीमंद आहे….. इतर खेळणाऱ्या मुलांकडे पाहून त्याला खेळावेसे वाटणे स्वाभाविक होते पण बॉल नेमाने फेकणे जमेना…. त्याची आई जिद्दीने खेळत होती त्याच्याशी…. त्याच्या आईचं कौतूक वाटत होतं मला तरिही काहितरी बोचत होतं….

लहान मुलांच खेळणं, आपणं बोललेलं त्यांना ऐकू येणं, ठराविक वयातली ठराविक वाढ किती किती गोष्टी आपणही गृहित धरल्या आहेत हे ’भान’ मला येत होतं….. हे सगळं असच व्यवस्थित मला मिळणार हे मी देखील ’गृहित’ धरलेलचं आहे की…. आपण हाका मारतोय लहान मुलं स्वत:च्याच नादात आहेत, लहान मुलंच का अगदी मोठी माणसंही , आपण किती चटकन म्हणतो ’ऐकायला येत नाही का? ’ …. भलेही त्याचा अर्थ लक्ष कुठेय तुमचे असा असला तरी वाक्यं किती सहजपणे बोलतो नाही आपण…. तीच वाक्यं जर खऱ्या रूपात समोरं आली की आपल्याला निभावता येतील हे प्रसंग असे आपणही गृहित धरलेले असावे….

जगात अनेकांना अनेक आजार होतात, त्याबद्दल आपल्याला कणव वाटावी इतपत सृहद आहोत आपण….. काही अघटित पाहिले की मन हेलावते वगैरे ठीक पण….. बरचं काही घडू नये असे घडतेय, सामाजिक जाणीवा वगैरे जागृत आहेत आपल्या… तरिही….

संकट येणार ते दुसऱ्यावर, आम्ही कसेही वागणार पण शिक्षा मिळणार दुसऱ्याला ही मोठमोठी गृहितकं ते अगदी रोजच्या व्यवहारातही कुठलाही चुकीचा प्रकार घडणार नाहिये हे ही तर गृहितचं की!! की बेसावध आहोत आपण….

खरं तर माझ्या आशावादी असण्याचा मला अभिमान आहे, माझे अजूनही असेच मत आहे की ’सगळे कायम चांगले आणि उत्तमच होणार’ … कुठल्याही गोष्टीआधि कामाआधि मनात निराशावाद घेऊन त्याला सुरूवात करू नये या मताशी मी ठाम आहे, तरिही का कोण जाणे या दोन प्रसंगांनतर मी ’गृहित’ हा शब्द तितकासा सहजपणे नाही वापरू शकत…. मुलांनी माझ्या बडबडीकडे दुर्लक्ष केले तरी ,”ऐकू येत नाही का” किंवा नादात चालताना ते कुठे धडकले तर ,” दिसत नाही का तुम्हाला” वगैरे वाक्यं नाही येत हल्ली माझ्या तोंडात….. मीच का, परवाच्या बागेच्या प्रसंगानंतर माझ्या दोन्ही पिल्लांना घट्ट धरून नवराही देवासमोर हात जोडून उभा होताच की…..

असे काहिसे बेसावध असणे, गृहित धरणे हे सरळ साधे सोपे आयूष्य़ जगण्यासाठी तसे खरे तर अत्यंत गरजेचे…. फक्त आपणही काही  ’गृहित’ धरतोय याचे ’भान’ तेव्हढे आता विसरायचे नाहिये….

आपल्याकडे काय काय नाही हे सांगायला जगात अनेक लोक असतात, नव्हे त्यांना तो चाळा असतोच….. आपल्याकडे काय काय आहे नी थोडेफार काय काय आपणही गृहित धरलेय याचा ताळमेळ मनात मांडला की आयूष्य अजून मस्त वाटेल का ??? अगदी त्या पॉलिसीच्या जाहिरातीमधल्या लोकांइतकं संकटांची यादी नको पण कुछ calculations तो बनते है …… नाही म्हणजे देवदयेने हातीपायी धड असणाऱ्या आपल्याला  जरा डोके आहे असे ’गृहित’ धरावे आणि ’भानात’ यावे असे आणि इतकेच…..

40 thoughts on “गृहित…

  1. ताई,
    एकदम अंतर्मुख करणारी पोस्ट.. अप्रतिम पोस्ट! कधीकधी सत्य एकदम दत्त म्हणून समोर उभं राहतं अन आपली गृहितकं माना खाली घालून उभी राहतात..
    तुझ्याकडून एका ठराविक अंतराळानंतर अशी अंतर्मुख करणारी पोस्ट येणार हे मी गृहित धरलेलं आहेच! 🙂

    • बाबा 🙂

      बघ ना अनेक लहानमोठ्या गोष्टी हक्क असल्यासारख्या गृहित धरणारे आपण माणसं आपल्याला कोणी जरा गृहित धरले की कसे चिडतो ना, “how can u take me for granted??? ” करून 😉 ….. कसला विरोधाभास आहे ना…

      >>> तुझ्याकडून एका ठराविक अंतराळानंतर अशी अंतर्मुख करणारी पोस्ट येणार हे मी गृहित धरलेलं आहेच! 🙂 …
      यावेळेसच्या राखी पौर्णिमेला काही नको देउस आता 😉 … चालेल 🙂

  2. तन्वी, नेहेमीप्रमाणेच सुंदर! आपल्याला जे मिळालंय, त्याचं मोल नसतं खरंच. ते आपण गृहितच धरतो. ते नसणारं कुणी समोर येतं त्या क्षणी जाणीव होते या गृहित धरण्याची.

    • गौरी आभार गं ….

      >>> आपल्याला जे मिळालंय, त्याचं मोल नसतं खरंच. ते आपण गृहितच धरतो. ते नसणारं कुणी समोर येतं त्या क्षणी जाणीव होते या गृहित धरण्याची. ..

      अगदी असेच गं… बरचं वाचतो वगैरे आपण पण बेसिक्स विसरतो नाही अनेकदा…. रात्री झोपताना गृहित की सकाळी उठणार आहोत, अन्न खाताना गृहित की ते पचणार आहे… भांडण करताना गृहित की ते टिकवायला दोन्ही पार्ट्या जगणार आहेत 😉 …. मोठ्ठी यादी आहे एकूणात गृहितकांची 🙂

  3. स्मायली नाही म्हटलं म्हणजे प्रकरण गंभिर आहे…
    मुद्दा पटला..
    उदा म्हणुन हे राहीलच… आजकाल मुले ही आई वडीलांना गृहितच धरुन चालतात…
    पोस्ट चांगली झाली आहे…

    • आनंदा अरे स्मायली न पहाणं तूला जितकं जड गेलं ना तितकचं ते न टाकता लिहिणं मला…. 🙂

      पण आजचा मुड जरा गंभीर विचारवंताचा होता खरा 😉 ….

      >>> आजकाल मुले ही आई वडीलांना गृहितच धरुन चालतात…
      नात्यांमधले गृहित धरणे हा तर वेगळ्या संपुर्ण पोस्टचा मुद्दा होऊ शकतो रे…

      आभार!!

  4. मुलांच्या बाबतीत बहुतांशाने आपण फारसा विचार न करता त्यांना गृहित धरत असतो पण…पहिलं गृहित चटका लावून गेलं, तर दुसरं गृहित काहिसं अपेक्षित होते. तिसर्‍याने एकदम अंत:र्मूख केले.

    • खरयं काका मुलांच्या बाबत तर आपली गृहितकं आणि जोरदार असतात….

      त्या लहानग्याला पाहिलं ना काका, त्याच्या चेहेऱ्यावरचे ते निरागस (हे हल्ली जरा अपवादाने मिळतात लहान मुलांत ) भाव पाहिले आणि ते लोंबकळलेले हियरिंग एड पाहिले, चित्राच्या फ्रेमसारखा हा प्रसंग मनात रहाणार आहे माझ्या आता…

      प्रतिक्रीयेसाठी आभार काका!!

  5. गृहित!!!!!, लेख भारी असेल अ्से गृहित होतेच माझे!!!!, भावनांचा आढावा आवडला मला तुम्ही घेतलेला

    • गुरूनाथ आभार आणि ब्लॉगवर स्वागत 🙂

      >>> लेख भारी असेल अ्से गृहित होतेच माझे!!!!
      हे कसे काय? तरिही आभार मात्र निश्चित 🙂

  6. तन्वी
    खरच आहे,आपण आपल्या आयुष्यात बर्याच गोष्टी गृहित धरत असतो. सगळ्यात मुख्य म्हणजे आपला जन्म. just imagine, how much thankful we all should be to be born where we are born! we have a safe and secure childhood, a promising career, a good family.much to rejoice for. can u imagine life if we were born-for example in drought and war ridden Africa or middle east countries ? or in the jopadpatties that abound around us.when people start complaining about their life or fate, i feel like reminding them about this.
    when my second daughter was born, the doctor and the nurses would not show me the baby, thinking i would take it badly. i started getting worried that there was something amiss. i told them, for god’s sake, i don’t want to whether it’s a son or a daughter, just tell me that baby is normal! we have a lot to be thankful for and let us be aware of it.
    sorry for writing in English. i couldn’t have expressed this effectively in Marathi. maybe we become too sentimental in our mother-tongue. : D

    • अरूणाताई आभार 🙂

      खरयं आपल्या अस्तित्वासाठीच आपण आभार मानायला तयार नाही आहोत…. जे जे मिळतेय त्याच्यावर जणू जन्माजन्माचा हक्क असल्याच्या आविर्भाव असतो आपला…. कधी कधी सत्य सामोरं ठाकतं आणि विचार करायला लावतं…..

    • सीया अगं मी पण विचारात पडले होते/ आहे… तेच मांडायचा प्रयत्न केला….

      प्रतिक्रीयेसाठी आभार गं…

  7. माझ्या लहानपणी शेजारीच एक मुलगा रहायचा ( मतीमंद) त्याच्या घरचे लोकं त्याला गजानन महाराजांचा अवतार म्हणून पूजा करायचे. काही भक्त पण यायचे त्याची पूजा करायला. अंगावरची वस्त्र काढून फेकुन द्यायचा तो. जवळपास १७ वर्षाचा झाल्यावर कुठल्या तरी आजाराने वारला.

    आज त्या सदा ची आठवण झाली बघ! उगाच उदास वाटतंय.. लहानपणीची नजरेआड गेलेली माणसं आठवली की विषण्ण वाटतं नाही??

    • महेंद्रजी…

      तुमची कमेंट वाचली आणि अश्या अनेक व्यक्ती आठवल्या ज्या नजरेआड गेल्याहेत…. खरय तुमचं विषण्ण वाटतं !!

      ही पोस्ट ना खरं तर ’गृहित आणि भान ’ अश्या नावाने लिहिणार होते कारण रोज सकाळी आपण उठतोय त्यासाठी सुद्धा देवाचे आभार मानायचे राहून जातात असे वाटतेय हल्ली…..

    • हेरंबा अरे दोन्ही प्रसंग अगदी सहज घडले रे…. पहिल्या प्रसंगातल्या त्या पिल्लाला आपल्यावर काही अन्याय झालाय देवाकडून याची जाणही नसावी इतकं सहज बागडत होतं ते …. मलाच चर्र झालं….. त्याच्या आईला जेव्हा समजलं असेल की आपण बोललेलं आपल्या पिल्लाला नाही ऐकू येत तेव्हा कसा निभावला असेल तिने तो प्रसंग….

      आपण धडधाकट असलो की माणसाला हेवा, राग, लोभ, मत्सर , असुया वगैरे अनेक गंड पछाडतात, मग वाटतं आपल्यापेक्षा देवाला ही लोकं जास्त लाडकी असावीत कारण ते स्वत:वर अवलंबून असतात .. कशाला गृहित न धरता…

      आभार रे!!

  8. thoda vegaLa angle: not at all personal.
    dusryanbaddal vait vataNe ha puN ek apalya egochach bhag ahe asa nahee ka vaTat? nahee mhaNala taree thoda ahe asa mala vatata. “to kitttee bichara” yat implicitly “maza sagaLa kittee chaan” hee supta bhavana asate ka?? vegavegaLe disasters ( for example recent one in Japan) apuN living room madhye basun chaveene charcha karat ka pahato?? kuthetaree swatala dilasa det asato ka? maNasacha swabhav thoda vighnasantoshee asato ka?? dusryabadaal vait vaTana he sopa asata, dusaryasaThee nikhaL anand tevadhach easily hoto ka???
    ase prashna hee manat ale mhaNun lihile, he tula uddeshun naheet, apalya sagaLyansaThee ahet. lekhabadaal kay bolu? jaudet.

    • स्मिता तुझं मत निश्चित वेगळं आहे जरासं….. पण इथे ’ego’ नाही म्हणता येणारं असं मला वाटतं…. जेव्हा आपल्याकडे खूप काही भरभरून आहे जे इतर कोणाकडे जरा कमी आहे तेव्हा आपल्याला सहानूभुती वाटणे/ वाईट वाटणे ही संवेदनशीलताही असू शकते ना….

      बाकि मला वाटतं जर आपलं खरचं संवेनशील मन असेल आणि भाव भावनांशी प्रामाणिक रहात येत असेल तर इतरांसाठी निखळ आनंदही होणारच 🙂

      प्रतिक्रीयेसाठी आभार गं!!

  9. smita
    it is not necessarily pity,or an egoistic satisfaction that evokes such feelings always. there is a thing called enpathy,which one fels and also perhaps a feeling of thankfulness to god that we have been saved from such miseries. Do you think one can fel it? I do, when I sit in my drawing room and watch the Japaneses disaster ot the photos of African children’s suffering. i thank god for all the small and big mercies shown to me and also feel a kind of obligation to try to lessen the miseries of those less fortunate than me.

    • अरूणाताई मला या sympathy आणि empathy या दोन्ही सारख्याच पण जरासा फरक असणाऱ्या शब्दांनी नेहेमीच भुरळ घातलीये… आजही तुम्ही sympathy ऐवजी empathy वापरलात… 🙂

      सहमत तुमच्याशी!!

  10. Dear Tanvi taai,

    Loved the article.. “Sangrahya”
    Just a thought that wanted to share : Assumptions do lead to surprises !! Surprises make life thrilling..
    (a positive side)

    With all agreements in opinions, it reminded me of misunderstandings, failures etc.. happened by taking things granted.. A Q 2 you : Does it show a belongingness or a trust or a dominance ?

    10 vichya bhumiti chya papermadhe “d” group che problems sodavtana creativity ladhwun vaparleli gruhitaka pan aathawli !! 😀

    • गौरव विचारात टाकलस गड्या 🙂

      >>>Assumptions do lead to surprises !! Surprises make life thrilling.. 🙂

      मला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर 🙂 …. बरोबर आहे तुझे, एखाद्या व्यक्तीला आपण ’ओळखतो’ असे आपल्याला ’वाटते’ तेव्हा बरेचदा आपण चटकन म्हणतो बघ, ’मला माहित होतं तू असाच/ अशीच वागणार/ बोलणार’ …. त्यामूळे हे असे गृहित धरणे हे नक्कीच belongingness or a trust or a dominance पैकी एक रूप आहे 🙂

      गट ’ड ’ माझाही झालाय सोडवून 🙂

      आभार रे…

    • सुर्यकांत आभार आणि ब्लॉगवर स्वागत…

      आता नेहेमी भेट होत राहिल अशी अपेक्षा करते 🙂

  11. aajach sakali STAR MAZA var tumchya blog baddal kalal ani tumhala pahila suddha!!!…sakalich link save karun thevli.sakalpasun blog vachtach hote pan aavdayla lagle mhnun mhtla ki aadhi comment post karavi,kharach khup chhan ahet blog. mala far aavdle.
    all the best!!

    • किर्ती आभार आणि ब्लॉगवर स्वागत…

      आता नेहेमी भेट होत राहिल अशी अपेक्षा करते 🙂

  12. तन्वी ताई, नेहमीप्रमाणे खूप छान लिहाल आहेस ,तुझ्या उत्तमोत्तम लेखांपैकी हा एक…..
    >>>फक्त आपणही काही ’गृहित’ धरतोय याचे ’भान’ तेव्हढे आता विसरायचे नाहिये….
    हे खूप आवडल …

Leave a reply to aruna उत्तर रद्द करा.